शेतकरी एमएन बँकेच्या अपहाराची आमदारांनी घेतली दखल, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत दिले निर्देश
सचिन धानकुटे
सेलू : – शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या अध्यक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असलेल्या आपल्या अडाणचोट भावाच्या नादी लागून बँकेत करोडो रुपयांचा अपहार केला. त्यामुळे खातेदारांचे जवळपास २५ कोटी रुपये बँकाच्या ९ शाखांत अडकले आहेत. याप्रकरणी आता वर्धा विधानसभेचे आमदार डॉ पंकज भोयर यांनी दखल घेत काल गुरुवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी बँकेच्या खातेदारांचे पैसे त्यांना परत देण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलून प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यात मिळून एकूण ९ शाखा आहेत. यात जवळपास ७ हजार खातेदारांचे २५ कोटी रुपये अडकले आहेत. सदर बँकेचा अध्यक्ष हा शरद कांबळे असून त्याची पत्नी प्रियंका आणि भाऊ रोशन कांबळे संचालक आहेत. यातील रोशन कांबळे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे हे विशेष.. याआधीही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने को-आपरेटिव्ह बँकेचं वाटोळे केल्याचं जगजाहीर आहे. त्याच धर्तीवर शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या अध्यक्ष शरद कांबळे ह्याने आपल्या अडाणचोट भावाच्या नादी लागून बँकेची सुरक्षा ठेव आंजी लगतच्या वंडरलॅड वॉटरपार्कमध्ये गुंतवणूक केली. दरम्यान अचानक बँकेचं नाव जिल्ह्यातील भूसंपादन घोटाळ्यात उजेडात आले. त्यानंतर खातेदारांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी बँकेत धाव घेतली. तेव्हापासून अध्यक्ष शरद कांबळे हा खातेदारांना तारीख पे तारीख देत असल्याने बँकेच्या खातेदारांत मोठा रोष निर्माण झाला आहे.
गेल्या चार महिन्यांपासून खातेदारांना बँकेच्या शाखातून पैसे मिळणे कठीण झाले आहे. काही शाखा तर सध्या कुलूपबंद आहे. खातेदारांनी आपल्या पैशासाठी ता.२५ मे रोजी अध्यक्ष शरद कांबळे आणि अरेरावी करणाऱ्या त्याच्या रोशन नामक भावाला त्यांच्याच घरात लाथाबुक्क्यांनी चांगलेच तुडवले होते. शेवटी पुन्हा एकदा २० जून ही नवी तारीख त्यावेळी देण्यात आली.
याप्रकरणी आता वर्धा विधानसभेचे आमदार डॉ पंकज भोयर यांनी दखल घेतली असून त्यांनी काल गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची यासंदर्भात भेट घेतली. यावेळी त्यांनी खातेदार आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत असे निर्देश दिले आहेत. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व सहकार मंत्री यांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष यासंदर्भात भेटणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे खातेदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
दरम्यान मध्यंतरी याप्रकरणी सगळे खातेदार एकवटले असून त्यांच्या नजरा देखील २० जूनकडे लागल्या आहेत. यादिवशी जर अध्यक्ष आणि त्याच्या भावाने खातेदारांना हूल देण्याचा प्रयत्न केला, तर मात्र खातेदारांच्या संयमाचा बांध फुटून संचालक मंडळाचा “हनुमान” झाल्यास नवल वाटायचं कारण नाही.