रेहकी येथे आज व्यसनमुक्ती सम्राट खराटे महाराजांचे किर्तन

सचिन धानकुटे
सेलू (ता.१०) : – नजिकच्या रेहकी येथे आज व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर खोडे उर्फ खराटे महाराज यांच्या समाजप्रबोधनपर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रेहकी येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५४ वा पुण्यतिथी महोत्सव कालपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून भजनी मंडळाचा दिंडी व पालखी सोहळा तसेच त्यानंतर लगेच दुपारी एक वाजता किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याकरिता महाराष्ट्र शासनाकडून व्यसनमुक्ती सम्राट उपाधीने गौरविण्यात आलेले हभप मधुकर खोडे उर्फ खराटे महाराज आपल्या सुमधूर व सुश्राव्य वाणीतून प्रबोधन करणार आहे. २० वर्षानंतर प्रथमच त्यांचे रेहकी येथे जाहीर किर्तन असल्याने आबालवृद्धात उत्साह तसेच चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या स्वागतासाठी परंपरागत वाद्यांचे नियोजन करीत संपूर्ण गावपरिसर रांगोळीच्या सहाय्याने सज्ज केला.