दीपचंदच्या मुलींचा हॉकी संघ राज्यस्तरावर ; विभागीय स्पर्धेत नागपूरच्या संघाला दिली मात

सचिन धानकुटे
सेलू : – स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालयातील मुलींच्या हॉकी संघाने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर थेट राज्यस्तरीय स्पर्धेत धडक दिली. विभागीय स्पर्धेत त्यांनी नागपूरच्या संघाला पेनाल्टी शूट आऊटमध्ये धूळ चारत मात दिली. सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटातील मुलींचा हा संघ आता नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर आपला दबदबा निर्माण करणाऱ्या येथील दीपचंद चौधरी विद्यालयातील मुलींच्या हॉकी संघाने विभागीय स्पर्धेत देखील सातत्य कायम ठेवले आणि अंजिक्यपद प्राप्त केले. चंद्रपूर येथील सैनिकी स्कूलच्या मैदानावर हॉकीचे विभागीय स्तरावरील सामने शुक्रवारी खेळविण्यात आले. यामध्ये दीपचंदच्या मुलींच्या संघाने आधी भंडारा व त्यानंतर फायनलमध्ये नागपूरच्या संघाला मात देत विजय मिळवला. फायनलचा सामना बरोबरीत सुटला होता, त्यामुळे पेनाल्टी शूट आऊटमध्ये १-० अशी आघाडी घेत संघाने विजयश्री खेचून आणली. यात “मेघना”ने केलेला एकमेव गोल व गोलरक्षक आरजू दमायेची कामगिरी निर्णायक ठरली.
हॉकीच्या विभागीय स्पर्धेत शाळेला मिळालेल्या यशात संघाची कर्णधार लावण्या बावणे, मेघना साठोणे, देवयानी धानकुटे, नंदिनी लाडे, प्राची कटरे, जान्हवी नंदनवार, हर्षदा चंदनखेडे, आरोही येवले, श्रुती डेकाटे, चैताली चहांदे, खुशी वरकड, रागिणी मांढरे, ऐश्वर्या परसखेडे, नाव्या बिसेन, हर्षदा मांढरे, गुंजन वाघाडे, ज्ञानेश्वरी पोहाणे सह गोलरक्षक आरजू दमायेचा मोलाचा वाटा आहे. यासोबतच संघ व्यवस्थापक शिक्षक संजय बारी, प्रशिक्षक सचिन तेलरांधे, साव मॅडम, चंदनखेडे मॅडम, माजी विद्यार्थी चैतन्य कांबळे, निखिल बडेरे, ओम अंभोरे, नैतिक तिजारे, यश दळवी यांनी खेळाडू विद्यार्थ्यांकडून कसून सराव आणि मेहनत करून घेतल्यामुळेच या अभुतपुर्व विजयाला गवसणी घालता आली.
शाळेच्या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे प्राचार्या सुहासिनी पोहाणे, सेलू शिक्षण मंडळाचे नवीनबाबू चौधरी, अनिलकुमार चौधरी, पर्यवेक्षक कल्पना मकरंदे, विजय चांदेकर, प्रा. मंगेश वडूरकर, जी. बी. खंडागळे, एच. जे. मुडे, हेमंत घोडमारे, प्रशांत चव्हाण, ज्योती उमाटे सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
दीपचंदच्या प्राचार्या हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू
हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू असलेल्या क्रीडाशिक्षीका सुहासिनी पोहाणे ह्या दीपचंद चौधरी विद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्यांनी आपल्या अनुभव आणि कौशल्याच्या बळावर शाळेतील विद्यार्थ्यांना हॉकी या खेळासाठी प्रोत्साहित केले. हॉकी हा देशाचा राष्ट्रीय खेळ असून साधारणतः शहरी भागातील खेळाडुंचेच त्यात वर्चस्व दिसून येते. परंतु राष्ट्रीय खेळाडू असलेल्या पोहाणे यांनी सेलू सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हॉकीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण असे योगदान दिले. त्यांनी अनेक खेळाडू आपल्या कार्यकाळात घडविले. विभागीय स्पर्धेत हॉकीमध्ये मुलींच्या संघाची उत्तम कामगिरी ही याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुलींचा विजेता संघ हा राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.