वात्रट तरुणाला प्रवाशांचे व्हिडीओ काढणे पडले महागात..! बसचा प्रवास पोलीस ठाण्यात, पोलिसांनी समाचार घेताच मागितली माफी
सचिन धानकुटे
सेलू : – धावत्या बसमध्ये प्रवाशांचे व्हिडीओ काढण्याचे सोंग एका वात्रट तरुणाला चांगलेच महागात पडले. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास येथील बसस्थानक परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी “त्या” तरुणाला चांगल्याच कानपिचक्या दिल्यानंतर अखेर माफीनामा नाट्य रंगले आणि वादावर पडदा पडला.
नागपूर आगाराची एम एच ४० वाय ५९२६ क्रमांकाची बस ही आज दारव्हा ते नागपूर असा प्रवास करत होती. दरम्यान त्या बसमध्ये वर्ध्याच्या हवालदार पूऱ्यातील मामून फारुकी नामक आंगतूक नागपूरला जाण्यासाठी बसला. यावेळी त्याने वर्धा बसस्थानकावर जागा आरक्षित करण्यासाठी बसच्या सिटवर एक रुमाल टाकला. दरम्यान बस पुढील प्रवासाला निघाली आणि त्या वात्रटाने प्रवाशांचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरू केले. यावर आक्षेप घेत इतर प्रवाशांनी बसमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. सदर बाब वाहकाच्या निदर्शनास येताच त्यांनी यासंदर्भात त्या वात्रटास हटकले. यावेळी त्याने दिलेले उत्तर हे सर्वानाच बुचकाळ्यात पाडणारे ठरले. त्यामुळे अखेर ती बस सेलू पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तीथे पोलिसांनी त्या वात्रटाला चांगलाच झापला आणि त्याच्या मोबाईलमध्ये असलेले प्रवाशांचे ते व्हिडीओ डिलीट करण्यात आलेत. एवढेच नाही तर त्या वात्रटाची तिकीट देखील वाहकाकडे जमा करण्यात आली. शेवटी वादावर कसाबसा पडदा पडला आणि बस पुढच्या प्रवासाला निघाली.