पाऊले चालती साईबाबांच्या शिर्डीची पायी वाट..! नागपूर ते शिर्डी पालखी सोहळ्याचे सेलूत जल्लोषात स्वागत
सचिन धानकुटे
सेलू : – येथील सुशिलादेवी पांडे कन्या विद्यालयात नागपूर ते शिर्डी पालखी पदयात्रा व रथयात्रेचे शनिवारी मोठ्या जल्लोषात आगमन झाले. याप्रसंगी साईनामासह ढोलताशांचा गजर अन् फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
साई पालखी परिवाराच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त “वारी स्वर्गसुखाची” हा साई पालखी महोत्सव-२०२४ दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आला. नागपूर येथील साई चॅरिटेबल ट्रस्टच्या विदर्भातील मानाच्या पालखीचे हे १७ वे वर्षे आहे. नागपूर ते शिर्डी अशा पालखी पदयात्रेचे गुरुवार ता.२८ रोजी भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून प्रस्थान करण्यात आले. शनिवारी हा पालखी सोहळा वर्धा जिल्ह्यात दाखल झाला. यावेळी पालखीत सहभागी भाविकांसाठी किशोर कृपलानी परिवाराच्या वतीने खडकी येथे दुपारी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर केळझर येथे देखील या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास पालखी सोहळा सेलू शहरात दाखल झाला. याप्रसंगी स्थानिक सुशिलादेवी पांडे कन्या विद्यालयाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली. यावेळी साईनामासह ढोलताशांच्या गजर अन् फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखी सोहळा मुक्कामाच्या ठीकाणी पोहचला. याप्रसंगी पांडे कुटुंबियांच्या वतीने पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी येथे रक्तान शिबीर व रेहकी येथील ओम साई बाल भजन मंडळाच्या सादरीकरणाने परिसर आधीच भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. त्यानंतर पालखी सोहळ्यातील सदस्यांनी देखील भजन संध्येत सहभागी होत “स्वर्गसुखाच्या वारीची” अनुभूती भाविकांना दिली. या जल्लोषपूर्ण वातावरणाचा आबालवृद्धांनी आस्वाद घेतला आणि त्यानंतर साईबाबांच्या आरतीने समारोप करण्यात आला. याठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पांडे परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर पालखी सोहळा हा आज रविवारी सकाळी आपल्या पुढील मार्गक्रमणासाठी मोठ्या उत्साहात पुन्हा मार्गस्थ झाला. यावेळी स्थानिक साईभक्त सुद्धा यात सहभागी झाले होते.
या पालखी सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी सुशिलादेवी पांडे कन्या विद्यालयाचे पिंटू पांडे, माळोदे सर, वाडीभस्मे सर, गेडाम सर, दिपक तडस, गणपत वांदिले, प्रकाश बडेरे, अनिल काटोले, धर्मेंद्र जवादे, संजय नंदनवार, कृष्णा पांडे, आदित्य पांडे, ओम वाघमारे, वेदांत जयस्वाल सह साईभक्तांनी अथक परिश्रम घेतले.