शेतकऱ्याला लाच मागणाऱ्या वनरक्षकासह वनमजूर एसीबीच्या जाळ्यात..! पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई
आरएनएन न्युज नेटवर्क
गोंदिया : – शासकीय जमीनीवरील झाडे तोडल्याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी शेतकऱ्याकडून लाच घेतल्याने वनरक्षकासह वनमजूरास येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी ताब्यात घेतले. पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने ह्या महिन्यात केलेली ही दुसरी कारवाई आहे. तुलसीदास प्रभुदास चव्हाण(वय३४) असे लाचखोर वनरक्षकाचे तर देवानंद चपटू कोजबे(वय५८) असे त्या लाचखोर वनमजूराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सडक अर्जुनी तालुक्यातील भोंडकीटोला येथील शेतकऱ्याची क्षेत्र सहाय्यक रेंगेपार अंतर्गत दल्ली बिटात शेती आहे. त्यांच्या शेतीलगतच वनजमीन आहे. सदर शेतकऱ्याने शेतीच्या वहिवाटीसाठी वनजमीनी लगतची झाडं झुडपे दोन आठवड्यापूर्वी तोडली होती. दरम्यान लाचखोर वनरक्षकाने १३ सप्टेंबर रोजी शेतकऱ्याला याप्रकरणी आपल्या सडक अर्जुनी येथील कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी शेतकऱ्यास अतिक्रमण केल्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आणि सदर कारवाई टाळण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली. यासंदर्भात सदर शेतकऱ्याने लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी दरम्यान वनरक्षकाने विस हजारांवरुन शेवटी दहा हजार रुपयांवर तडजोड केली. शेवटी आज शुक्रवारी या लाचखोरावर सापळा लावण्यात आला आणि त्यात तो अलगद अडकला. वनरक्षकाच्या सांगण्यावरुन वनमजूर देवानंद याने पाच हजार रुपये स्विकारल्यानंतर त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी वनरक्षक आणि वनमजूर अशा दोन्ही लाचखोरांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास काळे यांनी बोलताना दिली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास काळे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, सहाय्यक फौजदार करपे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, संगिता पटले, रोहिणी डांगे, दिपक बाटबर्वे आदी कर्मचाऱ्यांनी केली.