चवताळलेल्या बिबट्यास हाकलून पिल्लास केले जेरबंद, वनविभागाचे कर्मचारी आले अन् चोरासारखे पिल्लाला घेऊन गेले, हिवरा येथील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – चवताळलेल्या बिबट्यास हाकलून लावत त्याच्या पिल्लास जेरबंद करण्याची किमया तालुक्यातील हिवरा येथील नागरिकांनी आज गुरुवारी रात्रीच्या सुमारास केली. याठिकाणी तब्बल दोन तासानंतर वनविभागाचे कर्मचारी दाखल झालेत आणि त्यांनी चोरासारखे गूपचूप पिल्लाला घेऊन निघून गेल्याने नागरिकांतून मात्र कमालीचा रोष व्यक्त होत आहे.
हिवरा येथील एक शेतकरी आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शेतात जात होता. दरम्यान गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर नदीकाठी त्याला वाघ असल्याचा भास झाला. त्याने टार्चच्या सहाय्याने पाहणी केली असता त्याठिकाणी बिबट आढळून आला. परंतु यादरम्यान त्या चवताळलेल्या बिबट्याने त्या शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्याने हातातील थैली बिबट्याच्या दिशेने भिरकावली आणि गावाच्या दिशेने धूम ठोकली. परंतु बिबट्या देखील शेतकऱ्याचा पाठलाग करीत होता. शेवटी शेतकऱ्याने दगडधोंडे मारुन कसेबसे बिबट्यास हाकलून लावले.
परंतु या खडाजंगीत त्याठिकाणी बिबट्याचे मांजरीसारखे दिसणारे पिल्लू टाहो फोडू लागले. शेवटी नागरिकांच्या मदतीने त्या पिल्लाला जेरबंद करुन गावातील एका घरी सुरक्षित ठेवण्यात आले. यासंदर्भात तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. परंतु ते तब्बल दोन तास उशिराने पोहोचले. यावेळी नागरिकांनी वारंवार होणाऱ्या हल्ले तसेच जनावरे मारण्याची प्रक्रिया याविषयी जाब विचारला, मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चोरासारखे ते पिल्लू घेतले आणि तेथून काढता पाय घेतला. त्या पिल्लाच्या उजव्या डोळ्याला जखम झाल्याची यावेळी स्थानिकांनी माहिती दिली.