दफ्तरी ऍग्रोचे संचालक वरुण दफ्तरी यांना व्हॉईस ऑफ मीडियाचा “वर्धा उद्यम” युवा उद्योजक सन्मान
आरएनएन न्युज
सेलू : – येथील दफ्तरी ऍग्रोचे संचालक वरुण जैनेंद्रजी दफ्तरी यांना व्हॉईस ऑफ मीडियाचा “वर्धा उद्यम” युवा उद्योजक सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला.
सेलू येथील दफ्तरी ऍग्रोचे संचालक वरुण दफ्तरी यांनी सामाजिक दायित्व जोपासत तालुक्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात त्यांनी अनेक गरजवंतासाठी मदतीचा हात पुढे केला. उद्योजक असतानाही आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करीत त्यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वॉटर फिल्टर, शैक्षणिक साहित्य यासोबतच विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले. त्यांच्या उद्योगामुळे शहरातील अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. त्यांच्या ह्याच समाजोपयोगी कार्याची दखल घेत त्यांना वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने “वर्धा उद्यम” युवा उद्योजक सन्मानाने गौरविण्यात आले. नालवाडी येथील देशमुख सेलिब्रेशनमध्ये मंगळवारी पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी म्हस्के पाटील, ज्येष्ठ पत्रकार हरीभाऊ वझुरकर, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कथले, न्युज-१८ लोकमतचे ब्युरो चीफ प्रशांत लिला रामदास, व्हॉईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांच्या हस्ते वरुण दफ्तरी यांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकार मंडळीसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.