दहेगांवात एकाच रात्री आठ घरफोड्या ; साडेचार लाखांचा ऐवज लंपास
सचिन धानकुटे
सेलू : – दहेगांव गोसावी येथे चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास आठ ठिकाणी घरफोड्या करीत जवळपास साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला. यात दोन घरातील व एका पानठेल्यातील रोख रक्कम तसेच सोन्या व चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. एकाच रात्री आठ घरं तसेच दुकानं फोडल्याने नागरिकांत मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दहेगांव येथील बाबाराव लक्ष्मणराव घुडे यांच्या घरातील सोन्याच्या दोन सोनसाखळ्या, चार अंगठ्या, अडीच तोळ्याच्या दोन पोत, बिऱ्या, नथनी तसेच चांदीच्या तोरड्या आणि जोडवे यासह दोन हजारांची रोख रक्कम लंपास केली. यासोबतच रत्नाकर भोयर यांच्या घरातून सोन्याच्या बिऱ्या तसेच दोन हजारांची रोख रक्कम लंपास करण्यात आली. रामकिसन घुपे यांच्या पानटपरीतील एक स्पिकर तसेच साडेचार हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. गावातीलच निलेश मिटकर, निलेश राऊत, निलेश मसराम, माया वासुदेव बुलकुंडे व अंबादास नगराळे यांच्याकडे देखील चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र याठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. सदर घटना उघडकीस येताच गावात एकच दहशत निर्माण झाली आणि मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी ठसेतज्ञासह श्वान पथकास पाचारण करण्यात आले. वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील लागलीच घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी दहेगांव पोलीस अधिक तपास करीत आहे.