पवनार-सेवाग्राम रस्त्यावरील वाहतूक ठप्प ; पावसाने पर्यायी रस्ता खचला
बाजीराव हिवरे
पवनार : – पवनार-सेवाग्राम रस्त्यावरील पर्यायी रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णतः खचल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. सदर मार्गावरील वाहतूक ही वर्धा मार्गाने वळती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले.
पवनार-सेवाग्राम रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. सदर रस्त्यावरील निंबाळकर यांच्या शेताजवळ असलेल्या नागझरी नाल्यावर तात्पुरता पूल निर्माण करीत पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. परंतु काल शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या पूलाचा काही भाग खरडून गेल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली. येथे पर्यायी रस्त्यासाठी चार फुट व्यासाच्या सिमेंटच्या पाईपवर माती आणि मुरुम टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. शुक्रवारी तो रस्ता वाहून गेल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.
पवनार-सेवाग्राम आणि सेवाग्राम-पवनार वाहतूकीसाठी वर्धा मार्गाचा पर्यायी वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.