आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा – दत्ताजी मेघे : आरोग्य संकल्प अभियानाचे थाटात उद्घाटन ; ग्रामीण भागातील रुग्णांची लक्षणीय उपस्थिती
सचिन धानकुटे
सेलू : – शहरी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी सांवगी(मेघे) येथील रुग्णालय वरदान ठरले असून आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी कुलपती दत्ताजी मेघे यांनी व्यक्त केले. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शहरातील दीपचंद चौधरी विद्यालयाच्या प्रांगणात आरोग्य संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रामुख्याने डॉ अभ्युदय मेघे, खासदार रामदासजी तडस, आमदार डॉ पंकज भोयर, सुमित वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी राज पराडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, महामंत्री अविनाश देव, नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, उपनगराध्यक्ष रेखाताई खोडके, सेलू शिक्षण मंडळाचे अनिलकुमार चौधरी, नवीनबाबू चौधरी, शैलेंद्र दफ्तरी, भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, प्रदिपसिंह ठाकूर, मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे सह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते आरोग्य संकल्प अभियानाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य अभियानाचा लाभ घेण्यासाठी खेड्यापाड्यातील नागरिक तसेच रुग्णांचा मोठा जनसागर कार्यक्रमस्थळी उपस्थित होता.
आरोग्य संकल्प अभियानात अतिविशेष उपचार सुविधांसह मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषध वाटप देखील करण्यात आले. याप्रसंगी डॉ अभ्युदय मेघे, खासदार रामदासजी तडस, आमदार डॉ पंकज भोयर, सुमित वानखेडे, सुनिल गफाट, अविनाश देव, स्नेहल देवतारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमा दरम्यान तालुक्यातील आरोग्य सेवेच्या दूत असलेल्या आशा वर्करचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यासोबतच दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या दिनदर्शिकेचेही लोकार्पण करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना बसण्यासाठी म्हणून जवळपास १५०० बेंचेसचे संपूर्ण तालुक्यातील गावात वाटप करण्यात आले. यासोबतच दिव्यांगाना मागणीनुसार इलेक्ट्रिक व्हिलचेअर सुद्धा पुरविण्यात आल्यात. या आरोग्य संकल्प अभियानाचा जवळपास चार हजारांवर रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.