पोहण्याचा मोह जीवावर बेतला ; पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू ; वर्धा नदीच्या पात्रातील घटना

सचिन धानकुटे
वर्धा : – नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास वर्धा नदीच्या पात्रात घडली. फैजान खलील अहमद(वय२२) रा. पुलगांव व अजीज नासीर अहमद(वय२४) रा. ताजबाग, नागपूर असे सदर दुर्घटनेतील मृतकांची नाव आहे.
जिल्ह्यातील पुलगांव येथील घुबडटोली परिसरात आज शनिवारी लग्नानंतरच्या स्वागत समारोहाचा कार्यक्रम आयोजित होता. याकरिता आलेल्या काही तरुण पाहुण्यांनी यावेळी नदीच्या पाण्यात पोहण्याचा बेत आखला. यासाठी त्यांनी वर्धा नदीच्या गुंजखेडा नदी पात्राची निवड केली. येथे तीघांनीही पोहण्याचा आनंद घेतला, मात्र त्यांना येथील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीघेही बुडाले. यावेळी कोळी बांधवांना यातील एकास वाचविण्यात यश आले तर दोघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. मोहम्मद सादीक(वय१३) रा. नागपूर ह्याच्यावर सध्या सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या युवकांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी अधिक तपास पुलगांव पोलीस करीत आहे.