येळाकेळीच्या कापूस चोरणाऱ्या दोघांना अटक ; ९० किलो कापसासह मोटारसायकल जप्त : सावंगी पोलिसांची कारवाई

सचिन धानकुटे
वर्धा : – शेतातील गोठ्यात ठेवून असलेला कापूस चोरणाऱ्या येळाकेळीच्या दोघांना सावंगी पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत अटक केली. त्यांच्याकडून ९० किलो कापसासह मोटारसायकल असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकाश उर्फ पिंटू बापूराव तितरे (वय४५) व अमोल वसंतराव मेश्राम (वय ३७) दोघेही रा. येळाकेळी अशी कापूस चोरणाऱ्यांची नावे आहेत.
येळाकेळी येथीलच संजय किसनाजी दुधबडे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातून काल मंगळवारी ९० किलो कापूस चोरीला गेल्याची तक्रार सावंगी पोलिसांत दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून घेत तत्काळ तपासाला गती दिली. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार त्यांनी याप्रकरणी गावातीलच दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या कापसाच्या ९ गाठोड्यातील ९० किलो कापूस तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एम एच ३२ झेड २२९९ क्रमांकाची महिंद्रा सेंच्युरो मोटारसायकल असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी आबूराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या निर्देशानुसार पोलीस अंमलदार सतिश दरवरे, दुर्गेश बान्ते, स्वपनिल मोरे, प्रशांत वंजारी, श्रावण पवार आदि कर्मचाऱ्यांनी केली.