वुमन ऑफ एक्सलन्स अवार्डने सरपंच रेणूका कोटंबकार सन्मानित ; बँगलोरच्या श्री सत्यसाई ट्रस्टकडून पर्यावरणासाठीच्या उल्लेखनीय कार्याची दखल
सचिन धानकुटे
सेलू : – कोटंबा येथील सरपंच रेणूका कोटंबकार यांच्या पर्यावरणासाठीच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांना बँगलोर येथील श्री सत्यसाई ट्रस्टकडून वुमन ऑफ एक्सलन्स अवार्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले. झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी श्री सत्यसाई ट्रस्टचे संस्थापक मधुसूदन साई, माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर, बिर्ला ग्रुपचे चेअरमन, प्रसिद्ध सरोजवादक उस्ताद अमजदअली खान प्रामुख्याने उपस्थित होते.
बँगलोर येथील श्री सत्यसाई ट्रस्ट सेवा तसेच बलीदानाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणाऱ्या व्यक्तींना २०१६ पासून सन्मानित करीत आहे. यावेळी “ग्रामीण उन्नती – उत्कृष्टतेच्या महिला” या थीम अंतर्गत विविध क्षेत्रातील सात महिलांना सन्मानित करण्यात आले. यात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला व बालकल्याण, धर्मांची एकता, संगीत व ललित कला आणि योग अशा प्रकारच्या विभागात सात कर्तुत्ववान महिलांची निवड करण्यात आली.
कोटंबा येथील सरपंच रेणूका कोटंबकार यांनी गावात आपल्या कार्यकाळात पर्यावरणासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय असे आहे. याकरिता गावाला अनेक पुरस्कार देखील मिळालेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा वुमन एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला. झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना नुकतेच बँगलोर येथे सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.