सावंगीच्या ड्रीम लँड सिटीतील वरली-मटका अड्डयावर धाड; पाच आरोपींना अटक : पोलीस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई

सचिन धानकुटे
वर्धा : – पोलिसांनी वरली मटक्याच्या जुगार अड्डयावर धाड टाकत पाच आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सांवगीच्या ड्रीम लँड सिटीतील एका घरात पोलीस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने काल शुक्रवारी केली. दुर्गेश रमेश सुखेजा(वय४५), राकेश रमेश सुखेजा(वय३६) दोघेही रा. महाजन लॉन, कळंबे ले-आऊट, गणेशनगर, वर्धा, निवृत्ती उर्फ सोनू हनुमंत निवल(वय४२) रा. ड्रीम लँड सिटी, सावंगी(मेघे), पंकज संतोष पाटील(वय२५) रा. हरिहर नगर, बोरगांव(मेघे) अशी अटक करण्यात आलेल्यांची तर मनोज साकला असे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंगीच्या ड्रीम लँड सिटीतील निवृत्ती उर्फ सोनू निवल ह्याच्या घरात प्रभात व कल्याण मटक्याचा जुगार चालत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाला मिळाली होती. पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकताच घराच्या हॉलमध्ये वरली मटक्याचा जुगार सुरू होता. यावेळी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यासह घराची झडती घेतली असता ४५ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम, २ हजार ६६० रुपयांचे सट्टापट्टी करीता लागणारे साहित्य, १ लाख २९ हजारांचे सात अँड्रॉईड मोबाईल व ५५ हजार रुपयांच्या दोन मोटारसायकल असा एकूण २ लाख ३२ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील मुख्य आरोपी दुर्गेश सुखेजा हा सदर सट्टापट्टीची उतारी कमीशनवर मनोज साकला ह्याच्याकडे देत असल्याने त्याच्यावर सुद्धा महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथकाचे प्रमुख संदीप कापडे, पोलीस अंमलदार रोशन निंबाळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, प्रफुल्ल वानखेडे आदि क्राईम इंटेलिजन्स पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली.