चौघांनी “अंकिता”ची चाकूने वार करीत केली हत्या ; मारेकऱ्यात दोन युवतींचाही सहभाग ; दहेगांव (गोसावी) येथील घटनेने परिसरात खळबळ
किशोर कारंजेकर
वर्धा : – एका युवतीला चौघांनी घराबाहेर बोलावत चाकूने वार करीत तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यातील दहेगांव(गोसावी) येथे काल सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. अंकिता सतीश बाईलबोडे(वय२३) रा. दहेगांव(गोसावी) असे मृतक युवतीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, दहेगांव येथील मृतक अंकिता ही काल सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आपल्या घरी होती. यावेळी वर्ध्यातील दोन युवक आणि दोन युवती अचानक तीच्या घरासमोर आले. त्यांनी तीला घराबाहेर बोलावून घेत तीच्याशी झटापट करीत गळ्यावर चाकूने सपासप वार केलेत. यात ती गंभीर जखमी झाल्याने, तीच्या आईने आरडाओरडा करताच मारेकरी लागलीच घटनास्थळावरुन पसार झाले. जखमी अवस्थेतील अंकिताला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.
सदर घटनेनंतर नागरिकांनी पसार झालेल्या त्या मारेकऱ्यांचा पाठलाग केला असता जुनोना येथे नागरिकांनी मोठ्या शिताफीने त्या चौघांनाही ताब्यात घेतले आणि चोप दिला. तेथून त्यांना तत्काळ दहेगांव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सदर घटनेमुळे स्थानिकांत चांगलाच रोष असून परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या हत्या प्रकरणात दोन युवतींचा देखील समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंकितावर हल्ला करीत तीची हत्या का करण्यात आली, हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. दहेगांव पोलीस याप्रकरणी सखोल तपास करीत आहे.