राजकीय पक्षाच्या “मजनू” पदाधिकाऱ्याची प्रेयसीला मारहाण ; “त्या” पदाधिकाऱ्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
सचिन धानकुटे
वर्धा : – राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आपल्या प्रेयसीला चक्क मारहाण करीत जखमी केल्याची धक्कादायक घटना येथील जिल्हा परिषदेच्या आवारात सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीहून “त्या” मजनू पदाधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील महिला ही विवाहित असून ती आठ वर्षापूर्वीच आपल्या पतीपासून विभक्त झाली. सदर महिलेचे माहेर हे आर्वी असल्याकारणाने त्यांचे नेहमीच तीथे जाणे-येणे होते. दरम्यान आर्वी येथे त्यांची एका राजकीय पक्षाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. हळूहळू त्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने त्यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्यात. परंतु कालांतराने गेल्या तीन महिन्यांपासून तो तीला टाळायला लागला. एवढेच नाही तर फोन केल्यानंतर प्रतिसाद देखील देत नव्हता. अखेर सोमवारी फोन केल्यानंतर त्याने उचलला आणि आपण जिल्हा परिषद सभागृहात असल्याचे सांगितले. त्या लागलीच सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषद सभागृहात पोहचल्या, परंतु तो येथेही उशिराचं पोहचला.
दरम्यान दोघांचीही जिल्हा परिषदेत भेट झाल्यानंतर शाब्दिक वाकयुद्ध रंगले आणि यादरम्यान “त्या” मजनू पदाधिकाऱ्याने प्रेयसीला मारहाण देखील केली. यात त्याच्या हातातील कडे त्यांच्या डोक्याला लागल्याने डोक्यातून रक्त वाहू लागल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमुद आहे. याप्रकरणी पोलिसांनी “त्या” मजनू पदाधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहे. सदर प्रकारामुळे जिल्हा परिषद परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली होती.