शेतकऱ्यांचे धनादेश बाऊन्स करणाऱ्या “साईनाथ टेक्सटाईल्स”ला कापूस खरेदीसाठी बंदी ; कापसाच्या चुकाऱ्याचे धनादेश बाऊन्स झाल्याने शेतकऱ्यांत खळबळ
सचिन धानकुटे
सेलू : – कापसाच्या चुकाऱ्यापोटी देण्यात आलेले धनादेश बँकेत न वटताच परत आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांत मोठी खळबळ उडाली. सदर प्रकार साईनाथ टेक्स्टाईल्स प्रायव्हेट लिमिटेड जिनींगमध्ये गेल्या काही दिवसांपासुन सातत्याने घडत असल्याने बाजार समिती प्रशासनाने सदर व्यापाऱ्यास आजपासून कापूस खरेदी करण्यास बंदी घातली.
याबाबत सविस्तर वृत असे की, मौजा जुवाडी येथे दत्ता मेघे कुटुंबियांचे साईनाथ टेक्स्टाईल्स प्रायव्हेट लिमिटेड जिनींग, प्रेसिंग अँड ऑइल युनिट आहे. सदर युनिट हे त्यांनी आपल्या जावयाकडे सुपुर्द केल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कापसाच्या चुकाऱ्यापोटी देण्यात आलेले धनादेश न वटण्याचा प्रकार नित्याचीच बाब झाली आहे. आधी सुरुवातीला एक, दोन शेतकऱ्यांसोबत घडणारा हा प्रकार आता बऱ्याच शेतकऱ्यांसोबत घडत असल्याने आजपासून बाजार समिती प्रशासनाने सावध पवित्रा घेत साईनाथला कापूस खरेदीसाठी बंदी घातली.
चानकी(कोपरा) येथील शेतकरी गाठे यांचा साईनाथने लिलावात कापूस खरेदी केला होता. यावेळी चुकाऱ्यापोटी त्यांना सात दिवसानंतरचा धनादेश देण्यात आला. त्यांनी तो धनादेश जेव्हा बँकेत लावला, तेव्हा तो न वटताच परत आला. यासंदर्भात त्यांच्या मोबाईलवर १९ तारखेला तसा संदेश मिळाला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा सहा दिवसानंतर म्हणजेच २५ तारखेला आरटीजीएस द्वारे पैसे देण्यात आले. एक किंवा दोन शेतकऱ्यांच्या बाबतीत घडणारा हा प्रकार आता २० ते २५ शेतकऱ्यांसोबत घडत आहे.
सोमवारी येथील तब्बल पंचवीस पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे धनादेश अचानक बाऊन्स झाले. यावेळी बँकेकडून संबंधित खात्यात पैसेच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु खात्यात जर पैसेच नाही, तर शेतकऱ्यांना चेक दिलेच कसे आणि ते सुद्धा पंधरा दिवसांच्या कालावधीचे म्हणजे येथील बाजार समितीत पुन्हा “टालाटुले” सारखा तर किस्सा घडणार नाही ना.. अशी शंका उपस्थित होते.
पळसगांव(बाई) येथील शेतकरी गजानन तळवेकर यांच्या बाबतीत देखील असेच काहीसे घडले. त्यांचा २९ ला जमा होणारा धनादेश जमा झालाच नाही. त्यांनी जेव्हा यासंदर्भात साईनाथ गाठले, तेव्हा त्यांना आज म्हणजे मंगळवारी नवीन धनादेश देतो म्हणून बोलावून घेतले. परंतु तीथे गेल्यावर धनादेश न देताच त्यांना परत पाठविण्यात आले. दुपारनंतर आरटीजीएस होईल या आशेवर ते सध्या उपाशीतापाशी वाट पाहत आहे.