रणरागिणी संगीता बढे राज्यस्तरीय ज्ञानसिंधु स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित
सचिन धानकुटे
वर्धा : – ज्ञानसिंधू प्रकाशन नाशिक या बहुचर्चित संस्थेचा महिला दिवस पर्वाच्या अनुषंगाने या वर्षीच्या राज्यस्तरीय २०२३ चा ज्ञानसिंधु स्वयंसिद्धा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून ज्ञानवंत, गुणवंत, सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतीक, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या शेकडो महिलांच्या आलेल्या प्रस्तावातून एकूण २५० महिलांना विविध पुरस्कारांनी १९ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्य गृहात सन्मानित करण्यात आले.
यात वर्धा विभागातून रणरागिणी संगीता बढे अध्यक्षा रणरागिणी मंच महाराष्ट्र यांना मानाचा पहिला महिला राज्यस्तरीय ज्ञानसिंधु स्वयंसिद्धा २०२३ पुरस्काराने विविध मान्यवरांच्या ख्यातनाम लेखक लेखिका, कवी, साहित्यिकांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध साहित्यिका प्रतिमा इंगोले, ज्ञानसिंधु प्रकाशन परिवाराचे तान्हाजी खोडे, कार्यकारी संपादक साहेबराव नंदन, नवोदित कवी, लेखक चंद्रकांत तायडे यांच्यासह छत्रपती संभाजीनगरच्या महापौर सूनंदा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वर्धा विभागातून सामाजिक योगदानाची दखल घेत ज्ञानसिंधु प्रकाशनाने संगीता बढे यांची निवड केली. त्यांच्या या सन्मानार्थ समाजातील सर्व स्तरातून संगीता बढे यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.