वीज पडून शेतमजूराचा मृत्यू ; हिवरा येथील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – शेतात काम करणाऱ्या शेतमजूराच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास हिवरा शेतशिवारात घडली. रवींद्र मारोतराव सलामे(वय३५) रा. हिवरा असे मृतकाचे नाव आहे.
हिवरा येथील धाम साधना केंद्राच्या मागे असलेल्या कुऱ्हा शिवारात रमेश खोब्रागडे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात मृतक रवींद्र हा काम करीत होता. दरम्यान आज शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. यावेळी दुपारी ३ वाजून ५० मिनिटाच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या रवींद्रच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या सदर घटनेमुळे हिवरा येथे शोककळा पसरली आहे. मृतक रवींद्रचा मृतदेह सध्या उत्तरीय तपासणीसाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.