हत्येच्या दोन घटनांनी जिल्ह्यात खळबळ : इतवारा परिसरात गळ्यावर तलवारीचे घाव घालून महिलेची निर्घृण हत्या ; पुलगांवच्या निंबूफैलात युवकाची हत्या करीत मृतदेह फेकला नदीपात्रात
किशोर कारंजेकर
वर्धा : जुन्या वादातून मद्यधुंद व्यक्तीने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यावर तलवारीचे घाव घालून हत्या केली. ही घटना शहरातील इतवारा बाजार परिसरात रविवारी रात्री १०.३० ते ११ वाजताच्या सुमारास घडली. दुसऱ्या घटनेत पुलगांव येथे दारूविक्रीच्या उधारीच्या पैशातून झालेल्या वादात दारूविक्रेत्याची हत्या करून मृतदेह घुईखेड परिसरातील चंद्रभागा नदीपात्रात फेकून दिला. पुलगाव पोलिसांनी सदर हत्या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे तर वर्ध्यातील घटनेच्या आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मरियम शाह(वय६०) रा. इतवारा बाजार असे मृत महिलेचे नाव आहे. यातील आरोपी सचिन किसन कांबळे हा फरार आहे. तर अकबर अली जब्बार अली(वय३२) रा. लिंगूफैल पुलगांव असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पुलगांव पोलिसांनी अनिकेत शंकर वाघाडे, पूनम सतीश इरपाचे, आकाश प्रभाकर कोडापे, गौरव दीपक उईके, रूपेश रामेश्वर कावरे, स्वाती रामेश्वर कावरे, अभय देवीदास भागडकर, किसन मोतीराम राऊत, सुदाम सतीश काकडे सर्व रा. लिंगूफैल यांना अटक केल्याची माहिती दिली. जिल्ह्यात लागोपाठ झालेल्या खुनांच्या घटनांनी जिल्हा रक्ताळला असून पुन्हा एकदा गुन्हेगारी आपले पाय मजबूत करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
*मरियमच्या गळ्यावर तलवार फिरविली अन् ती रक्ताच्या थारोळ्यात पडली*
शहरातील इतवारा बाजार परिसरात घडलेल्या घटनेत मृत मरियम ही पतीसह घरी होती. दरम्यान, आरोपी सचिन किसन कांबळे हा मद्यधुंद अवस्थेत घरासमोर आला आणि जोरजोरात शिवीगाळ करू लागला. ता.२२ जुलै रोजी आरोपी सचिनला सूरज गौतम आणि धीरज गौतम यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात शहर ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याच कारणातून वाद उफाळला आणि आरोपी सचिन याने मृत मरियमच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मरियम व तिचा पती मेहबूब यांना “तुम्ही धीरज व सूरजला माझ्याविरोधात भडकविले, आज तुमचा गळा चिरतो”, असे म्हणत मेहबूबला घरातून खेचून बाहेर आणत मारहाण करून त्याच्या डोक्यावरून तलवार फिरविली.
मेहबूब घाबरून तेथून पळून गेला तेव्हा त्याची पत्नी मृत मरियम ही मध्यस्थीसाठी गेली आणि माझ्या पतीला का मारतो, अशी विचारणा केली असता क्रूरकर्मा सचिनने मरियमच्या डोक्याचे केस ओढून तिला रस्त्यावर खाली पाडून जवळील धारदार तलवारीने मरियमच्या गळ्यावर सपासप तीन ते चार घाव घातले. मरियम रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. ते पाहून आरोपी सचिनने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. अवघ्या काही मिनिटांतच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड तसेच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
*पोलिस चौकी उघडी असती तर वाचला असता जीव..*
इतवारा परिसर हा अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात अनेकदा गंभीर घटना घडलेल्या आहेत. मरियमची हत्या ज्या ठिकाणी करण्यात आली, त्याच्या अगदी शंभर पावलांवर पोलिस चौकी आहे. पोलिस चौकी जर उघडी असती तर कदाचित मरियमचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी दिली.
*आरोपी सचिन गुन्हेगारी प्रवृत्तीचाच*
आरोपी सचिन कांबळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. त्यातच मृत मरियमचा पती मेहबूब ऊर्फ पाडप्या हा देखील गुन्हेगारी वृत्तीचा असून गांजा विक्रीच्या गुन्ह्यांची नोंद त्याच्याविरुद्ध असल्याची माहिती आहे.
*पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात*
स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांकडून यासंदर्भात समांतर तपास केल्या जात आहे. खुनाची घटना घडताच आरोपीच्या शोधार्थ गुन्हे शाखेची पथके आणि शहर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इतवारा परिसर, स्मशानभूमीसह सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसर मध्यरात्री पिंजून काढल्याची माहिती आहे.
*अकबरचा मृतदेह नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न ; पुलगांवच्या निंबूफैलातील घटना*
दारूच्या उधारीतून दारूविक्रेत्या अकबर अली जब्बार अली याची हत्या करून मृतदेह अमरावती जिल्ह्यातील घुईखेड परिसरातील चंद्रभागा नदीपात्रात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मृताची पत्नी रजिया परवीन अकबर अली हिने पुलगांव पोलिसात तक्रार दिली. मृत अकबर हा पत्नी व तीन मुलांसह निंबूफैल परिसरात राहायचा. मृत दारूविक्रीचा व्यवसाय करायचा. परिसरातल्या मोहल्ल्यातील रहिवासी पूनम गवारी, सागर गवारी याच्या घरी अकबरचे येणे-जाणे होते. इतकेच नव्हे तर मृत अकबर आणि पूनमचे अनैतिक संबंध असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
ता.४ ऑगस्ट रोजी मृत अकबर रात्री ११ वाजता जेवण करून बाहेर गेला. रात्री १२ वाजताच्या सुमारास मृत अकबर आणि पूनम हे दोघही रेल्वे रुळालगत दिसून आले होते, मात्र सकाळपर्यंत अकबर घरी न पोहचल्याने अकबरचा सर्वत्र शोध घेण्यात आला. ता.५ ऑगस्ट रोजी अकबरच्या मित्राला पुलगांव पोलिसांनी ठाण्यात बोलावून तळेगाव दशासर हद्दीत सापडलेल्या मृतदेहाचा फोटो दाखविला असता तो मृतदेह अकबर अलीचा असल्याचे समजले. दारूविक्रीच्या उधारीच्या पैशातून अकबर अलीची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी नऊ आरोपींना पुलगांव पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली.