पुलगांव बसस्थानकातील पॉकेटमार “मोन्या” गजाआड
सचिन धानकुटे
वर्धा : – पुलगांव पोलिसांनी बसस्थानक परिसरात प्रवाशाचे पॉकेट मारणाऱ्या चोरट्यास अवघ्या दोन तासाच्या आत गजाआड केले. मोनू उर्फ मोन्या इंगळे(वय२५) रा. सुभाष नगर, पुलगांव असे त्या पॉकेटमाराचे नाव आहे.
पुलगांव बसस्थानकावर प्रवाशाच्या मागच्या खिशातील पॉकेट बसमध्ये चढताना मारण्यात आले. यावेळी असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ही संधी साधली. बसचे तिकीट काढतेवेळी सदर बाब प्रवाशाच्या लक्षात आली. गर्दीत एक जण आपल्याला धक्के मारत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले होते, त्यांनी मागे वळून बघितले, परंतु नकळत मागच्या खिशातील पॉकेट चोरीला गेले. त्यात सात हजार रुपये तसेच महत्त्वाचे कागदपत्रे होती. याप्रकरणी लागलीच पुलगांव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
पुलगांव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर अवघ्या दोन तासात पॉकेटमार “मोन्या”ला गजाआड केले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल देखील जप्त केला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे चंद्रशेखर चुटे, अमोल जिंदे, रवींद्र जुगनाके यांनी केली.