उन्हातान्हात सेवा देणाऱ्या पोलिसांसाठी थंडा-थंडा कूल वॉटर..! यंग सायकल रायडर्सचा स्तुत्य उपक्रम
सचिन धानकुटे
सेलू : – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. दरम्यान राजकीय पक्षाच्या काही बड्या नेत्यांच्या जिल्ह्यातील चकरा देखील वाढायला लागल्यात. याकरिता बंदोबस्तासाठी म्हणून उन्हातान्हात पोलीस दादा आपले कर्तव्य बजावत असल्याचे लक्षात येताच, शहरातील यंग सायकल रायडर्सच्या वतीने त्यांच्यासाठी ओआरएससह थंड पाण्याच्या बाटल्यांची मोफत व्यवस्था करण्यात आली. यंग रायडर्सच्या या स्तुत्य उपक्रमाचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील राजकीय वातावरणासह हळूहळू तापमानाचा पारा देखील वाढत आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून तर प्रचारसभांसाठी बड्या राजकीय नेत्यांच्या वाऱ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. साहजिकच पोलीस विभागातील कर्मचारी सातत्याने बंदोबस्तात व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यांना भरउन्हात आपले कर्तव्य पार पाडावे लागत असल्याने डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. यंग सायकल रायडर्सच्या शिलेदारांनी नेमकी हीच बाब हेरत त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी त्यांना ओआरएसचे टेट्रापॅक आणि थंड पाण्याच्या बाटल्या पुरविण्याचा संकल्प हाती घेतला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे.