वर्ध्यासह सेलूच्या अनियमित पाणी समस्येवर आज मुंबईत बैठक ; आमदार डॉ. पंकज भोयर यांचा पुढाकार
![](https://rajyognewsnetwork.com/storage/2023/02/IMG-20230215-WA0166.jpg)
सचिन धानकुटे
वर्धा : – वर्धा शहरासह लगतच्या तेरा गावांमध्ये तसेच सेलू शहरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्या बाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच निवेदन दिले होते़. सदर निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशावरुन राज्याचे प्रधान सचिव जगदाळे यांनी आज ता.१५ फेब्रुवारीला मुंबई येथे बैठक बोलाविली आहे. यावेळी पाणी समस्येवर चर्चा होऊन कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी लेखी निवेदनातून वर्धा, पिपरी(मेघे) सह लगतच्या तेरा गावातील तसेच सेलू येथील पाणी समस्येवर उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष्य केंद्रीत केले होते़. अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागत आहे़. उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या अधिक गंभीर होते़. याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी यावेळी केली होती. याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरुन प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ता. १५ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता जीटी रुग्णालय इमारत संकुल, मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दालनात ही बैठक बोलावण्यात आली आहे़. यासंदर्भातील पत्र संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहे़. बैठकीत पाणी समस्येबाबत चर्चा होऊन कायमस्वरुपी उपाययोजनेवर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आज आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दिली़.