‘शिक्षा मंडल’च्या सहाय्याने होतकरु विद्यार्थ्यांची ‘स्वप्नपूर्ती’ : संजय भार्गव : चार विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिबिरात स्थान
वर्धा : ‘द श्रीराम अनंता अॅस्पेन’ या संस्थेच्या वतीने दरवर्षी ‘द श्रीराम अनंता अॅस्पेन लिडरशीप प्रोग्राम’ घेतला जातो. या शिबिरामध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक होतकरु विद्यार्थ्याचे स्वप्न असते. परंतु या दोन आठवड्याच्या शिबिराकरिता आर्थिक अडचणी येत असल्याने गुणवत्ता व ईच्छा असूनही ते या शिबिरात सहभागी होऊ शकत नाही. परंतु ‘शिक्षा मंडल’ या संस्थेच्या सहाय्याने चार उत्कृष्ठ विद्यार्थ्यांना या शिबिरासाठी पाठवून त्यांची ‘स्वप्नपूर्ती’ केली, अशी माहिती शिक्षा मंडळचे सभापती संजय भार्गव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वर्ध्यातील ‘शिक्षा मंडल’ या संस्थेच्या सर्व महाविद्यालयातून विद्यार्थीकेंद्री शिक्षणावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगार आणि त्यांच्यातील गुणवत्ता सिद्ध करण्याकरिता विविध व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. यातूनच यावर्षी ऋषिकेश येथे आयोजित ‘द श्रीराम अनंता अॅस्पेन लिडरशीप प्रोग्राम’ करिता शिक्षा मंडलच्या महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची नावे पाठविण्यात आली होती. त्यापैकी माहेश्वरी गिरडे, संजना पुरोहीत, यशस्वी शिवणकर आणि अनमोल पंडीत या चार विद्यार्थ्यांनी निवड करण्यात आली. या चारही विद्यार्थ्यांचा खर्च शिक्षा मंडलच्यावतीने करण्यात आला असून हे विद्यार्थी दोन आठवड्यांच राष्ट्रीय शिबिर करुन परत आले आहे. या शिबिरामध्ये देशभरातील ७० विद्यार्थ्यांचा समावेश होता. या शिबिरातून विद्यार्थ्यांना एक वेगळी ऊर्जा आणि दिशा मिळाल्याचेही संजय भार्गव यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपला अनुभव कथन करुन शिबिराबद्दल माहिती देत स्वत: मध्ये झालेल्या बदलाबद्दल सांगितले. यावेळी बजाज कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. प्रदीप टेकाडे व उपप्राचार्य प्रा.संजय नाखले यांची उपस्थिती होती.
————————————–
*यावर्षीपासून सायन्स कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक धोरण*
शासनाने नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याच्या सूचना केल्या आहे. नागपूर विद्यापिठामध्ये तीन महाविद्यालयांनी या धोरणाची या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये वर्ध्यातील बजाज कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाचा समावेश आहे. या महाविद्यालयात यावर्षीपासून बीएएसी भाग-१ आणि एमएससी भाग-१ करिता नवीन शैक्षणिक धोरण राबविले जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. प्रदीप टेकाडे यांनी सांगितले. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या धोरणानुसार तीन वर्ष किंवा चार वर्षातही पदवी घेता येणार आहे. कौशल्य विकास, संशोधन आणि सर्जनशीलता यावर भर दिला जात आहे. यावर्षी या महाविद्यालयातील २३ विद्यार्थ्यांचा सीईटी स्कोअर ९० टक्केपेक्षा अधिक राहिला आहे. विशेषत: दहा विद्यार्थ्यांना विनाशिकवणी हे यश मिळविले आहे. महाविद्यालयाला या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच ‘डीएसटी-फिस्ट’ कडून ५७ लाखांचे अनुदान मिळाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
—————————————
*आयुष्यातील अविस्मरणीय क्षण*
मी गिरड या छोट्या गावातून बजाज कॉलेज ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेण्याकरिता आली. या महाविद्यालयात आल्यापासून शैक्षणिक जीवनाला वेगळेच वळण मिळाले. आताही शिक्षा मंडळ आणि महाविद्यालयाच्या सहकार्यामुळे पहिल्यांदा विमानातून प्रवास करण्याची संधी मिळाली आणि आम्ही दोन आठवड्याच्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी होऊ शकलो. या शिबिरामुळे वक्तृत्व शैली आणि नेतृत्व शैलीमध्येही मोठा बदल झाला असून हा आमच्या आयुष्याला एक अविस्मरणीय क्षण ठरला.
माहेश्वरी गिरडे, विद्यार्थिनी.