प्रौढ व बाल विभागात मोझरी तर महिला विभागात चंद्रपूरचे भजनी मंडळ अव्वल : रेहकीच्या राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेत ३१ भजनी मंडळांचा सहभाग
सचिन धानकुटे
सेलू : – रेहकी येथील राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेच्या प्रौढ पुरुष व बाल विभागात गुरुकुंज मोझरी तर महिला विभागात इंदिरा नगर, चंद्रपूर येथील भजनी मंडळाने बाजी मारली. यावेळी भजन स्पर्धेच्या तीन्ही विभागात एकूण ३१ भजनी मंडळानी आपला सहभाग नोंदवला.
नजिकच्या रेहकी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सतत दोन दिवस पार पडलेल्या या भजन सोहळ्याच्या प्रौढ पुरुष, बाल व महिला अशा तीनही विभागात एकूण ३१ भजनी मंडळ सहभागी झाले होते. यातील प्रौढ पुरुष विभागात मोझरी येथील स्वर गुरुकुंजाचे गुरुदेव सेवा भजन मंडळाने ३१८.५ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. वाशीम जिल्ह्यातील जुनोना येथील भजन मंडळाने ३१६.५ गुणांसह द्वितीय, हस्तापूर येथील सार्थक गुरुदेव सेवा भजन मंडळाने ३१५ गुणांसह तृतीय, निमगव्हाण येथील आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळाने ३११ गुणांसह चतुर्थ, वणी वागधरा येथील हर्षवर्धन गुरुदेव सेवा भजन मंडळाने २९०.५ गुणांसह पाचवे, माळउमरी येथील तन्मयानंद महाराज भजन मंडळाने २८४ गुणांसह सहावे, बोरगांव(मेघे) येथील ग्रामनाथ भजन मंडळाने २६८ गुणांसह सातवे, हिंगणघाट येथील संत गाडगेबाबा भजन मंडळाने २४७ गुणांसह आठवे, सातेफळ हिंगणघाट येथीलच सद्भावना गुरुदेव सेवा भजन मंडळाने २३६.५ गुणांसह नववे तर कृष्णनगर वर्धा येथील नम्रता श्री गुरुदेव सेवा भजन मंडळाने २३६ गुणांसह दहाव्या क्रमांकावर बाजी मारली. या विभागात एकूण १४ भजनी मंडळे सहभागी झाली होते.
बाल विभागात मानव छात्रालय मोझरी येथील गुरुदेव सेवा भजन मंडळाने २९९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. अकोला जिल्ह्यातील राहीत(बार्शी टाकळी) येथील गुरुदेव बालिका भजन मंडळाने २७१ गुणांसह द्वितीय, येथीलच श्री गुरुदेव सेवा बाल भजन मंडळाने २६१ गुणांसह तृतीय, आंबोडा येथील बाल गुरुदेव सेवा भजन मंडळाने २४४ गुणांसह चतुर्थ, पिवरडोल ता. झरी जामणी येथील जय पिवराई माता बाल भजन मंडळाने २४३ गुणांसह पाचवे, मल्हारदेवी घुग्गुस येथील बाल भजन मंडळाने २४२ गुणांसह सहावे, यवतमाळ जिल्ह्यातील बाबापूर येथील श्री गणेश बाल भजन मंडळाने २३५.५ गुणांसह सातवे तर कारंजा तालुक्यातील काकडा येथील लक्ष्मीकृपा बाल भजन मंडळाने २१२ गुणांसह आठव्या क्रमांकावर बाजी मारली.
महिला विभागात इंदिरा नगर चंद्रपूर येथील संतकृपा महिला भजन मंडळाने ३०३ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भद्रावती येथील महिला भजन मंडळाने २८९ गुणांसह द्वितीय, नेहरू नगर चंद्रपूर येथील जिजाऊ माता महिला भजन मंडळाने २८४.५ गुणांसह तृतीय, शेगांव येथील आप्पास्वामी महिला भजन मंडळाने २८४.५ गुणांसह चतुर्थ, देवळी येथील नवदुर्गा महिला भजन मंडळाने २७४.५ गुणांसह पाचवे, चनाखा चंद्रपूर येथील क्रांतीज्योती महिला भजन मंडळाने २६०.५ गुणांसह सहावे, बिहाडी कारंजा येथील गुरुमाऊली महिला भजन मंडळाने २५२.५ गुणांसह सातवे, काकडा येथील गुरुकृपा महिला भजन मंडळाने २४७.५ गुणांसह आठवे तर भादोड येथील संत निर्गुणजी महाराज महिला भजन मंडळाने २१० गुणांसह नवव्या स्थानावर बाजी मारली.
भजन स्पर्धेच्या आदल्या दिवशी येथे व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकरराव खोडे उर्फ खराटे महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम व तदनंतर राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. भजन स्पर्धे दरम्यान हभप प्रविण महाराज देशमुख यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी कथले यांनी सादर केलेल्या भजनांनी ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले. समारोपीय कार्यक्रमात परिक्षक बैस सरांच्या गायनाला परिक्षक दिपक भांडेकर सरांची तबल्याची सुरेख साथ व हार्मोनियमसाठी परिक्षक खाडे तिघांनीही श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन किरण मुजबैले, झाडे सर, ज्ञानेश्वरी घुमडे, वाघमारे यांनी केले.