आमदार समीर कुणावारांच्या प्रयत्नातून हिंगणघाट आगाराच्या ताफ्यात दहा नव्याकोऱ्या बसगाड्या
किशोर कारंजेकर
वर्धा : – हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून हिंगणघाट एसटी आगाराला नुकत्याच दहा नव्याकोऱ्या बसगाड्या मिळाल्यात. सदर बसगाडया या हिंगणघाट आगाराच्यि ताफ्यात नुकत्याच रुजू देखील झाल्या आहेत.
आमदार समीर कुणावार यांनी हिंगणघाट आगारासाठी शासनाकडे ४० बसगाड्यांची मागणी केली होती. यापैकी प्रथम चरणातील दहा बसगाड्या येथे कार्यरत झाल्या आहेत.
येथील आगारास नवीन बसगाड्या मिळाव्यात यासाठी आमदार समीर कुणावार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे विनंतीवजा मागणी केली होती. या मागणीतूनच दहा नवीन बसगाड्या हिंगणघाट आगाराला मिळाल्या आहेत.
येथील आगारातील जुन्या बसगाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याकारणाने तसेच अनेक बसगाड्या नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांना अशा बसमधून प्रवास करणे कठीण झाले होते. या आगारास नवीन बसगाड्या देण्यात याव्यात अशी येथील प्रवासी जनतेची देखील मागणी होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, महीला तसेच विद्यार्थिनींना नादुरुस्त बसेसमुळे प्रवास करतांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, परंतु आता या नवीन बसगाड्या आगारातील ताफ्यात रुजू झाल्यामुळे प्रवासी मित्र संघटनेच्या वतीने आमदार समीर कुणावार यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
जुन्या नादुरुस्त बसेसमुळे येथील एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रासाला सामोरे जावे लागत होते, नादुरुस्त तसेच भंगार अवस्थेतील बसगाड्यांमुळे प्रवासी जनतेचा रोष कर्मचाऱ्यांना पत्करावा लागत होता, परंतु उशीर का होईना आता त्यांनाही नव्या आलेल्या वाहनांमुळे समाधान मिळाले आहे. यामुळे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेने आमदार समीर कुणावार यांचे आभार व्यक्त केले.