सेलूच्या भाजी मार्केटात चोरट्यांचा उच्छाद..! रताळं खरेदी करणाऱ्याचे सत्तर हजार लंपास
सचिन धानकुटे
सेलू : – येथील भाजी मार्केटातून रताळ्याची खरेदी करणे एकास चांगलेच महागात पडल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास शहरात घडली. रताळ्याची खरेदी करताना दुकानासमोर उभ्या ठेवलेल्या त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून चक्क ७० हजार रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी सेलू पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलगांव येथील आशिष जनकराव धोंगडे यांनी शहरातील एका बँकेच्या शाखेतून ७० हजार रुपये काढलेत. त्यांनी ते पैसे एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवले आणि ती पिशवी आपल्या एमएच ई ०१६१ क्रमांकाच्या मोटारसायकला असलेल्या टिफिन ठेवण्याच्या बास्केटमध्ये ठेवली. दरम्यान त्यांना रताळे घ्यायचे असल्याकारणाने त्यांनी आपली मोटारसायकल भाजी मार्केटातील सत्यसाई सब्जी भांडारासमोर उभी केली आणि दुकानातून रताळे देखील घेतलेत. एव्हाना त्यांच्या मोटारसायकलच्या बास्केटमध्ये ठेवून असलेली पैशाची पिशवी चोरट्याने संधी साधून लंपास केली. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे येथील भाजी मार्केट पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. याआधीही शहरात दिवसाढवळ्या अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी एकाच रात्री सात दुकाने फोडण्याचा अनोखा विक्रम देखील याच शहरात केला. परंतु अद्याप तरी एकाही चोरीच्या घटनेचा स्थानिक पोलिसांना साधा थांगपत्ताही लावता आला नाही हे विशेष…