प्रतीपंढरी घोराड येथे उद्यापासून श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव, १० फेब्रुवारीला भव्य दिंडी पालखी सोहळा तर ११ फेब्रुवारीला दहीहंडी काला व महाप्रसाद : महोत्सवादरम्यान अकरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
सचिन धानकुटे
सेलू : – विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र घोराड येथे संत केजाजी महाराजांची ११७ वी पुण्यतिथी भक्तिभावात साजरी करण्यात येत असून महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्त उद्यापासून सतत अकरा दिवस विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार यासाठी संत केजाजी सेवा मंडळ तथा गावातील तरुणाईचा प्रामुख्याने पुढाकार असतो. शुक्रवार ता.९ फेब्रुवारीला श्री संत केजाजी महाराज यांच्या महानिर्वाण दिवशी समाधीपुजनासह भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवार ता.१० फेब्रुवारीला भव्य दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, तर ११ फेब्रुवारीला काल्याचे किर्तन, दहिहांडी काला आणि सायंकाळी महाप्रसादाचे वितरण होईल.
महानिर्वाण दिनी विदर्भाच्या विविध जिल्ह्यातील भाविक संतनगरी घोराडमध्ये दाखल होतात. १० आणि ११ फेब्रुवारीला घोराडमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळणार असून ३० ते ४० हजार भाविकांना पंक्तीच्या माध्यमातून येथे महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रवेशद्वाराची रंगरंगोटी करण्यात आली असून मंदीरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण गाव तोरण पताकांनी सजले असून ठीकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येत आहे. “साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा” याचा प्रत्यक्ष अनुभव येथे १० आणि ११ फेब्रुवारीला येतो. याप्रसंगी गावातील घराघरात पंचक्रोशीतील पाहुणे मंडळीची उपस्थिती असते. गावातून सासरी गेलेल्या मुली त्यादिवशीला गावात आवर्जून परत येतात. ता.१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हभप वासुदेव महाराज आर्वीकर धुळे यांचे समाज प्रबोधनपर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विठ्ठल वानोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ता.२ फेब्रुवारी पासून दररोज पहाटे ५.३० ते ६.३० काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण याकरिता प्रमोद महाराज ठाकरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सायकांळी ६ ते ७ हरिपाठ, ता.२ ते ८ फेब्रुवारी पर्यंत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवताचार्य हभप संतोष महाराज ठाकरे हे भागवत कथेला संबोधित करणार आहे. याशिवाय दररोज पहाटे दहा दिवस ग्रामस्वच्छता स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. याव्यतिरिक्त संतोष महाराज भालेराव यांचा भारूडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती तथा केजाजी सेवा मंडळ तसेच ग्रामस्थांनी केले आहे.