जिल्हा पुरवठा अधिकारी “भराडी”ला जडलायं भसम्या रोग..! पैशासाठी हपापलेल्या अधिकाऱ्यामुळे राशन दुकानदार त्रस्त
किशोर कारंजेकर
वर्धा : – येथील जिल्हा पुरवठा अधिकारी शालीकराम भराडी यांना अजबगजब असा पैसा खाण्याचा “भसम्या” नामक रोग जडला असून जिल्ह्यातील राशन दुकानदार सध्या त्रस्त झाले आहेत. “पैसे द्या नाही तर कारवाईला सामोरे जा..” असा ठेकाच सध्या “त्या” लाचखोर अधिकाऱ्याने धरल्यामुळे पाच-दहा हजार रुपये त्याच्या तोंडावर फेकून मारण्याची पाळी जिल्ह्यातील राशन दुकानदारांवर आली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून सध्या वर्धा जिल्ह्यात कार्यरत असलेले शालीकराम भराडी यांना वाशिम येथे ह्याच कारणास्तव निलंबित करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून येण्याच्या आधी सदर महाशय चंद्रपूर येथे कार्यरत होते. त्यावेळी तेथील जिल्हाधिकारी महोदय त्यांच्या उपद्रवमूल्यांमुळे चांगलेच त्रस्त झाले आणि त्यांनी त्यांना एक वर्षासाठी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. याप्रकरणी विभागीय स्तरावर त्यांची सध्या चौकशी देखील सुरू असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या नेहमीच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे कोणतेही जिल्हाधिकारी त्यांना रुजू करून घेत नाही हे कटू सत्य आहे. असे असताना लाचखोर “भराडी” सध्या अचानक गांधी जिल्ह्याच्या गळ्यात पडला.
याठिकाणी रुजू होताच त्यांनी आपला खाक्या दाखविणे सुरू केले. पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काहीही करा पण मला पैसे आणून द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा..! असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला. येथील राशन दुकानदारांना तर पैशासोबतच मदिरेचीही डिमांड केली जाते. त्रस्त झालेले राशन दुकानदार मात्र कारवाईच्या बडग्यामुळे कसेबसे पाच-दहा हजार रुपये त्यांच्या तोंडावर फेकून आपली सुटका करून घेत आहेत. याआधी कार्यरत असलेले येथील जिल्हा पुरवठा अधिकारी “सहारे” असेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते. मात्र त्यापासून यांनी काडीचाही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पैशासाठी हपापलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पैसे खाण्याचा “भसम्या” रोग तर जडला नाही ना..! अशी चर्चा सध्या जिल्ह्यातील राशन दुकानदारांत सुरू आहे.