दिड महिन्यांपासून शेतकरी पीक कर्जाच्या प्रतिक्षेत..! एसबीआयच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
सचिन धानकुटे
वर्धा : – एसबीआय बँकेच्या आडकाठीमुळे कवठा रेल्वे येथील शेतकरी गेल्या दिड महिन्यांपासून पीक कर्जाच्या प्रतिक्षेत आहे. यासंदर्भात पिडीत शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करीत पीक कर्जासाठी हयगय करणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
कवठा रेल्वे येथील अमोल सरदार यांच्याकडे सात एकर शेती आहे. पुलगांव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्यांचे खाते आहे. शेतीच्या वाहीपेरीसाठी त्यांनी ता.१५ जून रोजी बँकेच्या शाखेत पीक कर्जासाठी अर्ज सादर केला. परंतु दिड महिन्यांपासून ते अद्यापही पीक कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत. यासंदर्भात त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे बेजबाबदार पणाचे उत्तर दिले जाते. याउलट पीक कर्जाच्या मंजूरीचे अधिकार आम्हाला नसून मुख्य शाखेला असल्याचे सांगितले जाते. सदर पीक कर्जाचा प्रस्ताव मुख्य शाखेला पाठवण्यात आला असून त्याठिकाणी चौकशी करण्याचा सल्ला शेतकऱ्याला दिला जातो. आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे, त्यात बँकेच्या माध्यमातून त्यांना वेठीस धरले जाते. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या त्या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करीत पीक कर्जासाठी हयगय करणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आता काय निर्णय घेतात याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.