मुळासकट खरडून गेली शेतातील पिकं, काठावरील शेतात गाळचं गाळ..! शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतिक्षा, कृषी विभाग लापता
सचिन धानकुटे
सेलू : – अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या पिकांसह भाजीपाला वर्गीय पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेकडो एकरातील उभे पिकं पुराच्या पाण्यात मुळासकट खरडून गेल्याने शेतकऱ्यांना अद्याप पंचनाम्याची प्रतिक्षा आहे. पीक विमा कंपनीच्या जाचक अटी आणि शासनस्तरावर अद्याप पंचनामेच न झाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी संकटात सापडला असून तालुका कृषी विभागाचे अधिकारी मात्र बेपत्ता आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात सातत्याने मुसळधार पाऊस कोसळला. झडशी मंडळात तर शुक्रवारी सर्वाधिक १०९ मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत होते. पुराच्या पाण्यामुळे सखल भागातील अनेक घरांत गुडघाभर पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. यासोबतच दोन दिवस सतत आलेल्या पुरामुळे नदी व नाल्यांच्या काठावरील शेकडो एकरातील उभे पिकं खरडून गेल्याने मुळासकट वाहून गेले. सखल भागातील शेतांचे जणू काही जलतरण तलाव झाले. त्यामुळे त्यातील पिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली. पाण्याखाली आलेल्या उभ्या पिकांवर गाळ साचल्याने ती पिवळी पडून सध्या माना खाली टाकत आहे.
रेहकी, सुरगांव, कामठी, वडगांव, झडशी, अंतरगांव, सेलू, गोंदापूर, रमणा, कान्हापूर, धानोली, महाबळा, इटाळा, वाहितपूर आदि गावातील नदी व नाल्यांच्या काठावरील पिकांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. रेहकी येथील प्रमोद घुमडे यांच्या चार एकर शेतातील सोयाबीन आणि कपाशी अक्षरशः खरडून गेल्याने शेतात केवळ गाळचं शिल्लक राहिला. सेलूच्या पावर हाऊसजवळ असलेल्या एका शेतात अद्याप फुटभर पाणी साचून असल्याने तीन एकरातील कपाशी पाण्याखाली गेली आहे. सोयाबीन, कपाशी आणि तुरीच्या पिकांसह भाजीपाल्याला देखील झालेल्या मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी अशीच काहीशी परिस्थिती आहे.
सदर नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार सोनवणे आणि तलाठी भर पावसात फिल्डवर जाऊन देखील आलेत. यावेळी तालुका कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मात्र पत्ता नव्हता. अजूनही प्रत्यक्ष पंचनामा न झाल्याने प्रशासनाला नुकसानीचा आकडा अद्याप जाहीर करता येत नाही. प्रशासनाकडून केवळ वरपांगी पाहणी करण्यात आलीयं, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्याठिकाणी अद्याप ना तलाठी पोहचले, ना कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी..! त्यामुळे पुराच्या पाण्याने पिकं उध्वस्त झालेले शेतकरी अद्याप पंचनाम्याची प्रतिक्षा करीत आहेत.