Breaking
ब्रेकिंग

पंढरपूरात सेलूतील वारकऱ्यांच्या मठात राडा..! आर्थिक देवाण-घेवाणीतून धो-धो धूतल्याने झाली फजिती..! : दर्शन न करताच गावी परतण्याची ओढवली नामुष्की

2 4 6 3 0 3

सचिन धानकुटे

सेलू : – पंढरपूरात सेलूतील वारकऱ्यांच्या मठात रक्तरंजित राडा घडल्याची घटना बारसंच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी घडली. यात अनेकांना पार लाल होईस्तोवर स्थानिक महिला पुरुषांनी हाणल्याने काही जण जखमी देखील झालेत. त्यामुळे धास्तावलेल्या “त्या” महाभागांनी अखेर विठ्ठलाचं दर्शन न घेताच आपल्या घरचां रस्ता धरला. 

      यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सेलू शहरातील काही महाभागांनी लोकसहभागातून पंढरपूरातील शेगांव दुमाला येथे प्रशस्त असे भक्त निवास उभारले. सदर बांधकामाच्या अभियंत्याचे आप्तेष्ट आणि भक्त निवासाचे ट्रस्टी यांच्यात आधीपासूनच आर्थिक देवाण-घेवाणीचा वाद सुरू आहे. त्याच जुन्या वादाला फोडणी देण्यासाठी घोराड येथील एका माळकऱ्याने नेमकी हीच संधी साधली आणि वाद करणाऱ्यांना रसद पुरविल्याचे सांगितल्या जाते. बारसंच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारच्या सुमारास येथील एका ट्रस्टींच्या वाहनाचा धक्का लागला आणि स्थानिकांची सायकल पडली. या किरकोळ कारणावरून त्यांनी सेलूच्या भक्त निवासात घुसून धुडगूस घालत चांगलाच दंगा केला. मोबाईलमध्ये थोबाडं पाहून एक-एकाचा शोध घेत काही ट्रस्टींना यावेळी बेदम चोप देण्यात आलायं. विटा आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण केल्याने महिला आणि पुरुष ट्रस्टींना यात गंभीर इजा झाली. यावेळी मार खाण्यापासून वाचण्यासाठी काहींवर तर चक्क शौचालयात कुलूपबंद होण्याची पाळी आल्याचं सांगितल जातेय.

     याप्रसंगी मारणाऱ्यांचा राग हा केवळ निवडक ट्रस्टीवरचं होता हे विशेष.. यात एका सेवानिवृत्त अध्यापक महोदयांसह घोराड येथील एका व्यावसायिकाचा, वाहनचालकाचा आणि अन्य कारभाऱ्यांचा समावेश आहे. मारेकऱ्यांनी यावेळी विशीष्ट लोकांनाच टारगेट केल्याने शहरात सध्या उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे. शेवटी कसाबसा वादावर पडदा पडला आणि ज्यांनी मार खाल्ला, त्यांनी अखेर विठ्ठलाचं दर्शन न घेताच आपल्या वाहनांसह घरचा रस्ता धरल्याचे सांगितले जाते. दरम्यान शेगांव दुमाला येथील ग्रामपंचायतीच्या एका माजी पदाधिकाऱ्याने यशस्वी मध्यस्थी केल्याने तूर्तास तरी वाद निवळला, परंतु यापुढे त्याठिकाणी जो कोणी “अतिशहाणा त्याचा बैल रिकामा” असेचं काहीसं म्हणावं लागेल.

 

“त्या” मठावर आरोप प्रत्यारोप

      सेलूकरांनी लोकसहभागातून पंढरपूरात भक्त निवासाचे बांधकाम केले. त्याला आधीपासूनच वादाची किनार आहे. येथे जाणाऱ्या भाविकांना सापत्न वागणूक दिली जाते, तेथील आरओच्या पाण्यावर देखील भाविकांचा अधिकार नाही. तहानलेल्यास पाणी देणं पुण्याचं मानलं जातं, परंतु याठिकाणी मात्र त्यालाही हरताळ फासला जातोयं. सढळ हाताने मदत करणाऱ्या भाविकांना भागवतासाठी साधी जागा देखील उपलब्ध करुन न दिल्याचीही ओरड आहे. येथे एकाधिकारशाहीमुळे अनेकांचा हिरमोड झाल्याने याविषयी आरोप प्रत्यारोप होत आहेत.

 

झारीतील शुक्राचार्य शेवटी “माळकरी”

     पंढरपूरात बारसंच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या राड्याला स्थानिक माळकऱ्याची फूस असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एका माळकऱ्याने दुसऱ्या माळकऱ्यां विरोधात षडयंत्र रचणे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. अध्यात्मात अथवा वारकरी संप्रदायात अशा प्रकारच्या गोष्टींना थारा नाही, त्यामुळे झारीतील त्या शुक्राचार्या विषयी देखील उलटसुलट मतप्रवाह आहेत.

1.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 6 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे