गॅस शेगडी”च्या प्रवाहात सर्वपक्षीय नेतेमंडळी..! रवींद्र कोटंबकार यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा..!!
सेलू : – ४७-वर्धा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या आखाड्यात साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचं निवडणूक बोधचिन्ह “गॅस शेगडी” असून बुधवार ता.६ रोजी त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. याप्रसंगी विधानसभा मतदारसंघातील समर्थकांसह सेलू तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा प्रामुख्याने समावेश होता.
केळझर येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातून बुधवारी सकाळी प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यानंतर खडकी येथील हनुमान मंदीरात, घोराड येथील श्री संत केजाजी महाराज व शनी मंदिर, हिंगणी येथील गणेश मंदिर व देवीच्या मंदिरात, बोरी येथील भोंडाई माता, येळाकेळी येथील पंचमुखी हनुमान मंदिर, जामणी येथील दर्गा तसेच वर्ध्यातील बालाजी मंदिरासह छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सेलू येथील विद्यादिप सभागृहात सायंकाळी सात वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार रवींद्र कोटंबकार, सेवानिवृत्त तहसीलदार बाबाराव तीनघसे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव बेले, माजी सदस्य श्यामसुंदर बोबडे पाटील, अशोकराव दंढारे, प्रफुल्ल लुंगे, संजय धोंगडे, वाहितपूरचे माजी सरपंच सुभाष डायगव्हाणे, रेहकीचे माजी उपसरपंच राजेश झाडे, एचपी गॅस एजन्सीचे संचालक धर्मेंद्र जवादे, गणेश खोपडे, दिलीप भुजाडे, गणेश कंडे, बायलू डेकाटे, किशोरराव मुडे, कदीर पठाण, प्रकाश बडेरे, आशिष मुडे, डॉ बजरंग मसराम, रेणुका कोटंबकार, येळाकेळीच्या लक्ष्मी लिचडे, दिवाकर मांढरे, रवींद्र सोनटक्के, संतोष डाखोळे सह साहसिक जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय नेते मंडळीसह कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांपासून रवींद्र कोटंबकार सामाजिक उपक्रमासह समाजसेवक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी जिल्ह्यातील ४० दिव्यांगासह ४ हजार बेरोजगारांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांच्या सेवेसाठी दोन ॲम्ब्युलन्स तसेच स्वर्गरथ सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. कोरोनाकाळात जिल्ह्यातील हजारो नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील युवकांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा, सेलू शहरात ३५ वर्षांनंतर प्रथमच भव्य अशा शंकरपटाचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याने आजच्या युवा पिढीला प्रथमच शंकरपटाचा थरार अनुभवायला मिळाला. शासकीय कार्यालयातील सर्वसामान्य जनतेचे कोणतेही काम असो चुटकीसरशी सोडविण्यात रवींद्र कोटंबकार यांचा हातखंडा आहे. त्यांचं निराश्रितांना राशनकार्ड उपलब्ध करून देत मुख्य प्रवाहात आणण्याचं काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या अशा एक ना अनेक उपक्रमामुळे त्यांनी अल्पावधीतच जनसामान्यांचा “आमदार” म्हणून ख्याती प्राप्त केली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांचा देखील त्यांना पाठिंबा मिळत असून तालुक्यातील जनतेने तर यावेळी निर्धारचं केलायं की, आता यापुढील आमदार फक्त रवींद्र कोटंबकार हेच असतील. वर्धा विधानसभा मतदारसंघात “गॅस शेगडी”चा प्रचार जसजसा तापतोय, तसतसा राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा जोर सध्या कमी होत असल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे.