आर्वी नाका परिसरात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची मागणी ; वर्धा सोशल फोरमचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सचिन धानकुटे
वर्धा : – शहरातील आर्वी नाका परिसरात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची उभारणी करावी, अशा आशयाचे निवेदन वर्धा सोशल फोरमच्या वतीने आज बुधवारला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले.
वर्धा जिल्हा हा महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला असून गांधी जिल्हा अशी ओळख असलेल्या वर्ध्याच्या शेजारी सेवाग्राम व पवनार येथे महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम आहेत. त्यांच्या विचारांची शिदोरी नेहमीच वर्धेकरांच्या पाठीशी आहे. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच महिला मुक्तीदिन असल्याने आपल्या शहरातील आर्वी नाका परिसरात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना तशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे, सचिव अविनाश सातव, सहसचिव श्याम परसोडकर, कोषाध्यक्ष रवींद्र टप्पे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.