वर्ध्यातील देहव्यापाराच्या अड्डयावर पोलिसांची धाड ; दोघांसह एक महिला ताब्यात
सचिन धानकुटे
वर्धा : – शहरातील देहव्यापाराच्या अड्डयावर छापा टाकत पोलिसांनी दोन जणांसह एका महिलेस ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासह शहर पोलिसांनी केली.
शहरातील अनेक ठिकाणी राजरोसपणे अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय सुरू असल्याची कुणकुण पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला लागली होती. शहरातीलच काही पुरुष स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता महिला तसेच मुलींना पैशाच्या मोहात अडकवून चक्क वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतात. अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सदर देहव्यापाराच्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी आधी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करून घेतली. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावर पवन लॉजच्या अगदी बाजूला असलेल्या स्वराज रेस्टॉरंटमध्ये छापा टाकला. यावेळी तीथे खोली क्रमांक दोनमधून मयूर नंदकुमार ठाकरे(वय३०) रा. वार्ड क्रमांक एक, रामनगर वर्धा व प्रदीप लक्ष्मण कुबडे(वय६२) रा. धंतोली चौक, वर्धासह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. तीघेही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेकडुन वेश्याव्यवसाय करवून घेताना पोलिसांना आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून तीन मोबाईलसह पाचशे रुपयांच्या दोन नोटा असा एकूण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीघांवरही कलम ४,५,७ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार व पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख संदीप कापडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.