तळेगावच्या कब्रस्थान परिसरात स्फोट : एक व्यक्ती गंभीर जखमी : २७ स्फोटकांचे गोळे केले पोलिसांनी जप्त

किशोर कारंजेकर
वर्धा : तळेगाव येथील कब्रस्थान परिसरात स्वच्छताकाम सुरू असतानाच आज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान तब्बल २७ बारुद भरलेले स्फोटक गोळे मिळाले. त्यातील एक स्फोटकांचा गोळा सफाईकाम करणार्याच्या हातात फुटल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्याचे नाव रवी रामकृष्ण निकम (वय ४५) रा. तळेगाव आहे.
पोलिस, स्फोटके निकामे करणारे पथक तसेच स्फोटके शोधणारे श्वानपथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्फोटकांचे २७ गोळे जप्त केले आहेत. रमजान ईद असल्याने येथील कब्रस्थान परिसराची स्वच्छता करण्याचे काम सुरू होते. सफाईच्या कामाकरीता दोन मजूर काही दिवसांपासून काम करीत होते. अशातच आज सकाळी रवी रामकृष्ण निकम तसेच शेख हरून हे दोघे साफसफाईचे काम करीत असताना इदगाहजवळ काही बारुद भरलेले स्फोटकांचे गोळे पडून असल्याचे दिसले.
साफसफाई करीत असताना रवी निकम याचा त्या गावठी स्फोटकाला हात लागताच स्फोट होवून रवी निकम याच्या हाताला गंभीर इजा होत तो जखमी झाला. या घटनेची चर्चा परिसरात पसरताच काही नागरिकांनी याची माहिती ठाणेदार आशिष गजभिये यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. तर जखमीस एजाज पठाण यांनी समयसूचकता दाखवित आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले.
त्या परिसरात आणखीही स्फोटके असल्याची शंका आल्याने बीडीडीएस पथकाला पाचारण केले. बॉम्ब शोधक पथकाने परिसरातून एकूण २७ स्फोटके भरलेले गोळे जप्त केले. मात्र ही बाब लगेच लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी एटीएस पथकासह ठाणेदार आशिष गजभिये, उपनिरीक्षक पवन भांबूरकर, उपनिरीक्षक हुसेन शहा, उपनिरीक्षक दिपेश ठाकरे आणि पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता.