भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सची बसला धडक, ९ प्रवासी जखमी, जखमींत तीन लहान मुलांचाही समावेश, केळझर येथील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – खाजगी ट्रॅव्हल्सने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला दिलेल्या धडकेत ९ प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास केळझर येथे घडली. सदर अपघातातील जखमींमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्सची एमएच ४० सिटी १९३८ क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स ही टाकळघाट येथून आजनसरा येथे वरात घेऊन जात होती. दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची एमएच ४० एक्यू ६३२७ क्रमांकाची बस ही वर्ध्याहून नागपुरच्या दिशेने निघाली. यावेळी जुनगड मार्गे केळझरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सने केळझर येथील शहिद हरिभाऊ लाखे स्मारक चौकात बसला जोरदार धडक दिली. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. यात दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. सदर अपघातात बसमधील दोन तर ट्रॅव्हल्समधील सात असे एकूण ९ जण जखमी झालेत. यात बसचा वाहक गणेश सहारे(वय४२) वर्धा आगार यांच्या डाव्या पायाला आणि हाताला तर बसमधील प्रवासी आर्या मंगेश लसुंते(वय२२) रा. मानस मंदिर वर्धा यांच्या डोक्याला इजा झाली. खाजगी ट्रॅव्हल्समधील जखमींत सोहम महेंद्र ईटनकर(वय११) रा. हिंगणा या बालकाचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले तर लंकेश प्रभाकर बावणे यांच्या डोक्याला व त्यांची दिड वर्षांची चिमुकली राधा हिच्या खांद्याला इजा झाली. तेजस कृष्णा मेहर(वय९) रा. नागपूर ह्याच्या डोक्याला, शामराव सागार(वय३५) रा. टाकळघाट यांच्या गळ्याला, गिता दामोदर बारई(वय५४) रा. बुट्टीबोरी व तृप्ती दिलीप तिवारी(वय२५) रा. बुट्टीबोरी यांच्या डोक्याला इजा झाली. सदर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने जखमींना आधी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर खाजगी ट्रॅव्हल्सचा चालक हा घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जाते.
अपघातस्थळी खाजगी ट्रॅव्हल्सला वळण घेण्यासाठी गती कमी करण्याची गरज होती, परंतु त्यावेळी चालकाचा अतिउत्साह नडल्याचे यावेळी सांगितले जाते. सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत अपघातास कारण ठरलेली चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस स्वतः पोलीस ठाण्यात जमा केली. राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी धायरे यांनी आपल्या टिमसह घटनास्थळी भेट दिली.