भरणीत मुंडके अडकलेल्या श्वानाला अखेर विसावाने दिले जीवनदान ; गेल्या २६ दिवसांपासून अडकला होता भरणीच्या विळख्यात
सचिन धानकुटे
वर्धा : – प्लास्टिक भरणीच्या आत गेल्या २६ दिवसांपासून डोकं अडकलेल्या श्वानाचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. भरणीत अख्खे डोके अडकल्याने त्याची उपासमार होत होती. अशातच तो चवताळलेल्या अवस्थेत सैरभैर फीरत होता. शेवटी यासंदर्भात माहिती मिळताच विसावाच्या टिमने त्या श्वानाला गाठून भरणीत अडकलेले त्यांचे मुंडके मोकळे केले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून विसावा ॲनिमल्स फाऊंंडेशनच्या हेल्पलाइनवर शहरात एका बेवारस श्वानाच्या डोक्यामध्ये भरणी अडकल्याची माहिती मिळाली होती. विसावाच्या टीमने त्या श्वानाचा शोध घेतला असता तो श्वान सापडत नव्हता. त्या श्वानाच्या डोक्यात खाद्यपदार्थांची भरणी फसली असल्यामुळे तो जीव वाचविण्याकरीता सैरावैरा पळत सुटला होता. शेवटी काल सायंकाळी शहरातील प्रतापनगर भागातील मुनोत ले-आउट परिसरातून सुधीर चाफले नामक व्यक्तीने विसावा संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला. तो श्वान त्यांच्या घरासमोरच्या नालीच्या आतमध्ये लपून बसल्याची माहिती दिली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता संस्थेचे संचालक किरण मोकदम, त्यांची अर्धांगिनी सारिका मोकदम व व्हॉलीनटीअर अथर्व धमाने असे तिघे अवघ्या दहा मिनिटात घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी पाहणी केली असता लक्षात आले की, तो श्वान ज्या नालीमध्ये लपून बसला होता. ती नाली एका बाजूला बंद होती. ज्यांच्या घरासमोर ती नाली होती त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्या नालीवर कडप्पा टाकून पॅक केलेली होती. मग एक एक कडप्पा काढत ती जागा तिथून ब्लॉक करत करत संस्थेची टीम त्या श्वानाला एका बाजूला पकडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू लागली. ही बाब त्या श्वानाच्या लक्षात येताच त्याने विसावा टीमवर हल्ला करणे सुरू केले. कारण त्याला हे लक्षातच येईना की, हे लोक त्याचा जीव वाचविण्यासाठी आलेले आहेत. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर तो श्वान आटोक्यात आला आणि मग त्याला त्या नालीमधून बाहेर काढून त्याच्या डोक्यातील भरणी काढणे हे मोठे आव्हान होते. कारण तो श्वान हल्ला करून चावण्याचा प्रयत्न करत होता. अखेर हे बचाव कार्य अक्षरशः जीव धोक्यात घालून पूर्ण करण्यात आले.
सदर बचावकार्यासाठी तिथल्या स्थानिकांबरोबरच संस्थेचे सदस्य स्वावलंबी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विजय भोयर यांचीही मदत मिळाली. ह्या दीड तासांच्या थराराचा व्हिडिओ अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा कैद केला. गेल्या २६ दिवसांपासून ही भरणी त्या श्वानाच्या डोक्यात अडकलेली होती, तेव्हापासून तो श्वान अन्नपाण्यावाचून स्वतःचा जीव वाचविण्याकरता इकडेतिकडे भटकत होता. पण म्हणतात ना..! “देव तारी त्याला कोण मारी” आज मात्र विसावा ॲनिमल्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्याला जणू काही जीवनदानचं मिळाले. याप्रसंगी विसावा संस्थेमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले की, कृपया रिकाम्या झालेल्या खाद्यपदार्थाच्या भरण्या अशा उघड्यावर कुठेही टाकू नका, कारण हे भटके जीव खाण्याच्या शोधामध्ये अशा भरण्यांमध्ये खाद्य शोधायला जातात व अडचणीत येतात. अशा प्रकारच्या भरण्याची योग्य ती विल्हेवाट लावून त्या क्रश म्हणजेच चपट्या करूनच फेकाव्यात.