सेलूचे दुय्यम निबंधक कार्यालय दलालांच्या विळख्यात, पक्षकारांचे गळे कापण्यासाठी निबंधकांनी पोसलेले दलालचं बनले “डकेट”
निबंधक करमरसाठी दलाल करतात दिवसभर "मरमर" अन् पक्षकारांची होतेय "लूट"
सचिन धानकुटे
सेलू : – येथील दुय्यम निबंधक कार्यालय सध्या दलालांच्या गराड्यात अडकले असून निबंधकांनी येथे पक्षकारांचे गळे कापण्यासाठी काही खास “डकेट” दलालांची नेमणूक केली आहे. येथे नियमांवर बोट ठेवत आधी पक्षकारांची अडवणूक केली जाते व “लक्ष्मी” दर्शनानंतर तेच प्रकरण सोयीस्कर हाताळले जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या अनागोंदी व बोगस कारभाराची वरिष्ठांनी चौकशी करावी, अशी मागणी पक्षकारांकडून जोर धरत आहे.
येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या शासकीय इमारतीतचं दुय्यम निबंधक कार्यालय आहे. येथे मालमत्ता खरेदी विक्रीच्या नोंदणीसाठी दुय्यम निबंधक दोन्ही पक्षकारांना नियम सांगून खरेदी विक्रीची रजिस्ट्रीच होत नसल्याचे सांगत पक्षकारांना आल्यापावली परतवून लावतात. असाच काहीसा प्रकार मौजा बेलगाव शिवारातील शेती खरेदी-विक्रीची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या पक्षकारांसोबत ता.३१ ऑक्टोंबर रोजी घडला. शेती विकणाऱ्या व घेणाऱ्या व्यक्तीला विकणारा भूमिहीन होत आहे, तसेच या विक्रीच्या प्रकरणात सिंचन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र जोडलेले नाही, असे सांगत त्याची नोंदणी होत नाही, म्हणून परतवून लावले. सदर सौदा हा लाखोंचा असल्याने लगेच बाहेर बसलेल्या “करमरकर”च्या दलालाने नेमके “सावज” हेरले आणि खरेदीदाराला गाठत मोठ्या रक्कमेच्या सौद्यात रजिस्ट्री करण्याची हमी देत तेच प्रकरण दुय्यम निबंधक “करमरकर”कडे पुन्हा सादर केले. यावेळी मात्र करमरकरांच्याने अमितने सदर प्रकरणात कोणत्याही प्रकारची त्रुटी न काढता लगेच खरेदी-विक्री पत्राची नोंदणी केली हे विशेष…
अशाप्रकारे येथे नियमांचा बागुलबुवा उभा करीत पक्षकारांचे गळे कापण्याचा एककलमी कार्यक्रम निबंधक तसेच दलालांकडून राबविण्यात येत आहे. येथे मोठ्या रक्कमेच्या मोबदल्यात अनेक खरेदी-विक्रीच्या बोगस नोंदण्या करण्यात आल्या आहेत. नागपूर येथून अपडाऊन करीत असलेल्या “करमरकर” नामक दुय्यम निबंधकाचे एका हेविवेट नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध असल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे. त्याच ओळखीच्या आधारावर येथे दलालांना अवैध वसुलीसाठी प्रोत्साहित केल्या जात असल्याने नेमका “तो” महाभाग नेता कोण..? याविषयीची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बोगसबाजी करून अनेक खरेदी-विक्रीच्या नोंदणी झालेल्या आहेत. शेती खरेदी करतांना घेणाऱ्याजवळ शेती असणे आवश्यक आहे, मात्र हा नियम धाब्यावर बसवून अशा लोकांच्याही मोठ्या रकमेत निबंधक महाशयांनी खरेदीच्या नोंदणी केलेल्या आहेत, येथे झालेल्या या बोगस कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करणे आता गरजेचे असून सर्वसामान्यांची अडवणूक करणाऱ्या “त्या” दुय्यम निबंधकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.