मुरुमाच्या गाड्या अन् मास्तरची खदखद..! अडवणूक करणं गुरुजींना भोवलं, सावंगी पोलिसांत गुन्हा दाखल
आरएनएन न्युज नेटवर्क
वर्धा : – मुरुमाच्या गाड्यांची अडवणूक करणे आणि आपल्या मनातील खदखद सार्वजनिकरित्या व्यक्त करणं कराळे गुरुजींना चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात नितेश कराळे नामक गुरुजींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.
वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. याकरिता त्याठिकाणी मुरुम टाकण्याचे कंत्राट नालवाडी येथील कंत्राटदार सचिन बबनराव खोडके यांना मिळालं असून त्यांच्या मुरुमाच्या गाड्या खदखद फेम कराळे मास्तरांनी येळाकेळीच्या खदान गेट परिसरात अडवून धरल्यात. ही घटना रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. कंत्राटदार खोडके पांढरकवडा येथील सर्व्हे नंबर ५६ मधून कायदेशीर रित्या मुरुमाचं उत्खनन करून ट्रकच्या माध्यमातून स्वावलंबीच्या मैदानावर मुरुम घेऊन जात होते. दरम्यान कराळे मास्तरांनी त्यांच्या गाड्या अडवून धरत स्वतःच कलेक्टर असल्याच्या तोऱ्यात त्यांना दमदाटी करीत अश्लील शिव्यांची लाखोळी वाहिली. याप्रकरणी कंत्राटदार खोडके यांनी सावंगी मेघे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी खदखद फेम कराळे मास्तरांवर भारतीय न्याय संहिताचे कलम १२६(२), ३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सावंगी पोलीस करीत आहेत.