उघड्या रोहित्राला स्पर्श झाल्याने युवकाचा जागीच मृत्यू, भालेवाडी येथील घटना
गजानन बाजारे
कारंजा (घा) : – वीजपुरवठा सुरू असताना शेतातील रोहित्राला स्पर्श केल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तालुक्यातील भालेवाडी येथे घडली. आकाश अमृतराव चौधरी (वय२०) असे मृतक युवकाचे नाव आहे.
मृतक थ्रेशर मशीनने मळणी करण्याचा व्यवसाय करून कुटुंबाला मदत करायचा. आज नेहमीप्रमाणे तो मळणीसाठी मशीन घेऊन शेतात गेला, परंतु यावेळी वीजप्रवाह सुरू नव्हता, याबाबत त्याने संबंधित लाईनमनला वारंवार दोन दिवसांपासून फोनवर माहिती दिली होती. शेतशिवारातील विद्युत प्रवाह सुरू करावा अशी विनंती केली होती, पण त्यास विलंब झाला, विद्युत प्रवाह सुरू होण्यास उशीर झाल्यास मळणीचे काम करण्यास वेळ लागेल, म्हणून आकाश स्वतःच रोहीत्राजवळ पोहचला आणि वीजप्रवाह सुरू करायला गेला, परंतु त्यावेळी अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला आहे, याची पुसटशी कल्पना देखील त्याला नव्हती. त्याचा स्पर्श रोहीत्राला होताच शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती गावात पोहचताच एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी व महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आकाशचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पण यावेळी गावकऱ्यांनी व मृतकाच्या नातलगांनी शवविच्छेदन करू देण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाची स्थिती रुग्णालयात निर्माण झाली होती. यावेळी सगळ्यांनी महावितरणवर आपला रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच आमदार दादाराव केचे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन उपस्थित नागरिक व मृतकांचे नातेवाईक तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या मध्यस्थीमुळे हा तणाव निवळला. गावातील उमद्या व कर्तृत्ववान युवकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावावर सध्या शोककळा पसरली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी
आकाश राजूरकर, उपविभागीय अभियंता महावितरण कारंजा यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.