Breaking
ब्रेकिंग

शेतकरी एमएन बँक अपहार..! कर्मचाऱ्यांसह खातेदारांचा आमदारांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा : शरद कांबळेला ४ दिवसांचा अल्टीमेटम, प्रशासन अलर्ट मोडवर

2 6 9 1 6 3

सचिन धानकुटे

वर्धा : – शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांसह खातेदारांनी आज गुरुवारी आमदार डॉ पंकज भोयर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढला. यावेळी हजारोंच्या संख्येने खातेदार आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.

       शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या ९ शाखांत एकूण सात हजार खातेदारांची जवळपास २५ कोटी रुपयांची रक्कम अडकली आहे. बँकाच्या शाखांमधून फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासून खातेदारांना साधी दमडी देखील मिळाली नाही. शेतकरी महिला निधी लिमिटेडचा अध्यक्ष शरद कांबळे ह्याने आपल्या भावाच्या नादी लागून बँकेच्या सुरक्षा ठेवीसह मोठ्या प्रमाणात रक्कमेचा अपहार केला. सदर रक्कम आपल्या वंडरलॅड वॉटरपार्क‌‌‌मध्ये गुंतवणूक केली. तशा प्रकारच्या नोंदी देखील बँकेच्या सिस्टीममध्ये स्पष्टपणे आढळून आल्यात. सुरळीतपणे सुरू असलेल्या बँकेचा डोंगा पाण्यात बुडविण्यासाठी शरद कांबळे आणि त्याचा भाऊ रोशन कांबळे या दोघाही भामट्यांनी कोणत्याही प्रकारची कसर ठेवली नाही. भूसंपादन घोटाळ्यातील रक्कमेवर डोळा ठेवून दोघांनीही मिळून बँकेचे वाटोळे केल्याचं जगजाहीर आहे. 

     गेल्यावेळी कमीतकमी तीस दिवस आणि जास्तीतजास्त पंचेचाळीस दिवसांत खातेदारांचे पैसे देण्याचे आश्वासन हवेत विरले. त्यानंतर पुन्हा २० जूनपर्यंत त्यांना मुदत देण्यात आली होती. याकरिता आज गुरुवारी आमदार डॉ पंकज भोयर यांच्या नेतृत्वाखाली विश्रामगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात बँकेच्या कर्मचाऱ्यांसह खातेदार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या वाटाघाटीत पोलीस प्रशासन खातेदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. यावेळी अध्यक्ष शरद कांबळे मात्र गैरहजर होता. शेवटी विश्रामगृह येथे रात्री पार पडलेल्या बैठकीत मात्र शरद कांबळे उगवला. तेव्हा आमदार डॉ पंकज भोयर यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. शरद नाटकं बंद कर, तुला चार दिवस देतोय, काय करायचे ते करं, त्यानंतर मात्र बोंबलायचे नाही, असा धमकीवजा इशारा दिला. त्यामुळे येणाऱ्या चार दिवसांत शरद कांबळे काय दिवे लावणार, याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे.

 

खातेदार पैशासाठी आक्रमक

     आजच्या आक्रोश मोर्चा दरम्यान खातेदार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रत्येकाने आपापल्या हातात प्रक्षोभक सूचना फलक घेऊन यावेळी शरद कांबळे विरोधात घोषणा दिल्याने परिसर दणाणून सोडला. यावेळी महाठग शरद कांबळेला पाठीशी घालणाऱ्या विरोधात देखील खातेदार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

2.3/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे