पोटनिवडणुकीत अतिक्रमण धारक उमेदवाराचा अर्ज मंजूर ; इमला कराच्या पावतीवर अर्ज स्विकारल्याचा आक्षेप ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

आरएनएन न्युज
आष्टी : – उमेदवारी अर्जातील खोट्या माहितीच्या आधारावर चक्क अतिक्रमण धारक उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्याचा प्रताप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केल्याची तक्रार नुकतीच करण्यात आली. इमला कराच्या पावतीवर सदर अर्ज मंजूर करण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्ते राजकुमार खरे यांनी यासंदर्भात तहसीलदार यांच्यासह संबंधिताकडे तक्रार दाखल केली.
आष्टी तालुक्यातील माणिकनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक सध्या होवू घातली आहे. गेल्या निवडणुकीत येथे निवडून आलेल्या सरपंच महिलेविरोधात अविश्वास ठराव पारीत करीत त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. “त्या” जागेसाठी सध्या पोटनिवडणूक होत असून खोट्या माहितीच्या आधारावर उमेदवारी अर्ज मंजूर केल्याचा आरोप केला जात आहे. ज्यांचा अर्ज मंजूर झाला, त्या लक्ष्मी दिलीप सनेसर यांच्या उमेदवारी अर्जात बऱ्याच विसंगती आहेत. ज्यात रातोरात शौचालय उभे करणे, ग्रामपंचायतीच्या नमुना आठ प्रमाणे अतिक्रमण आहे, परंतु ते नियमानुकुल नाही. उमेदवाराच्या पतीच्या नावे २८९ चौरस फुटाचे अतिक्रमण नमुना आठ नुसार नियमानुकुल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी पारीत केला खरा, परंतु ग्रामपंचायत रेकार्डला अतिक्रमण असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात १७०० चौरस फुटाचे अतिक्रमण दिसून येत आहे. यासोबतच घर टॅक्स पावती ऐवजी इमला कराच्या पावतीवर अर्ज मंजूर करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्षेप असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदर अर्ज मंजूर केल्याने याविरोधात सामाजिक कार्यकर्ते राजकुमार खरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली. यावर ते काय निर्णय घेतात याकडे येथील नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी दिपक काळूसे यांनी सदर तक्रारीत सबळ पुरावे आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.