Breaking
ब्रेकिंग

नवविवाहित बहिणीला माहेरी आणण्यासाठी निघालेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू ; वर्षभरापूर्वीच पोष्टमन पदावर झाला होता रुजू

2 6 7 9 5 3

सचिन धानकुटे

सेलू : – नवविवाहित बहिणीला आखाडीसाठी माहेरी आणण्यासाठी निघालेल्या भावाचा बसच्या अपघातात होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात घडली. करण पुरुषोत्तम बुधबावरे(वय२७) रा. झडशी असे मृतकाचे नाव आहे. करणच्या अपघाती निधनामुळे झडशीसह पंचक्रोशीत सध्या शोककळा पसरली आहे.

झडशी येथील करण बुधबावरे नामक तरुणाच्या वडिलांचे चार वर्षापूर्वीच निधन झाले. ते झडशी येथेच पोष्टमन पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर करणची अनुकंपानुसार पोष्टमन पदावर गेल्या वर्षीच नियुक्ती झाली. यावर्षीच्या उन्हाळ्यातचं बहिणीचे लग्न झाले. तीला पुणे येथून माहेरी आणण्यासाठीचं काल शुक्रवारी करण हा विदर्भ कंपनीच्या खाजगी ट्रॅव्हल्सने पुण्यासाठी जायला निघाला. यावेळी तो दुसऱ्या क्रमांकाच्या सीटवर बसल्याची माहिती ट्रॅव्हल्स कंपनीच्या रेकार्डला उपलब्ध आहे.
दरम्यान ही खाजगी बस कारंजा(लाड) येथे प्रवाशांनी जेवण घेतल्यानंतर समृद्धी महामार्गाने पुण्याच्या दिशेने निघाली. यावेळी रात्री १ वाजून ३५ मिनिटांनी सदर बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा येथे अपघातग्रस्त झाली. बस आधी वीजेच्या खांबावर धडकली आणि त्यानंतर थेट पहिल्या लेनमधून घासत तीसऱ्या लेनमध्ये गेली. यात झालेल्या घर्षणामुळे बसला तत्काळ आग लागली. यावेळी बस प्रवेशद्वाराच्या साईडनेच कलंडल्याने प्रवाशांना काही बाहेर पडता आले नाही. पाहता पाहता आग वाढत गेली आणि सदर अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर आठ प्रवासी गंभीर जखमी झाले. यात वर्धा जिल्ह्यातील १४ प्रवाशांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
बसच्या अपघाताची माहिती मिळताच झडशीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. करणच्या अपघाती निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बुलढाणा बस अपघातात समावेश असलेल्यांत वर्धा शहरातील कृष्णनगरातील वृषाली वनकर, शोभा वनकर, ओवी वनकर आणि श्रेयस पोकळे तसेच साईनगर येथील राधिका खडसे, स्वागत कॉलनीतील श्रेया वंजारी, फुलफैल येथील तनिष्का तायडे, आर्वी नाका येथील प्रथमेश खोडे, गिताई नगर येथील अवंती पोहणकर, अल्लीपूर येथील संजीवनी शंकरराव गोटे, झडशी येथील करण बुधबावरे, पवनार येथील सुशिल खेलकर, आर्वी येथील राजश्री गांडोळे, हिमाचल प्रदेश येथील परंतु सध्या वर्धा येथे वास्तव्यास असलेल्या पंकज रमेशचंद्र ह्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

4/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 7 9 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे