महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजना प्रभावी – रामदास तडस : ग्रामीण भागातील महिलांसाठी मार्गदर्शन मेळावा ; सेलूच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे आयोजन

सचिन धानकुटे
सेलू : – प्रत्येक क्षेत्रात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान देखील युद्धपातळीवर काम करीत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी शासनस्तरावरील योजना प्रभावी ठरत असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. सेलू येथील विद्यादिप सभागृहात आयोजित महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वच्छता, आरोग्य, कुटुंब, कायदेविषयक तसेच इतर विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन आज शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार रामदास तडस तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे, माजी सभापती अशोक मुडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती सोनुने, वैद्यकीय अधिक्षक पल्लवी खेडेकर, तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाडीभस्मे, विस्तार अधिकारी दादाराव राठोड, डॉ कमलेश पिसाळकर, अतुल चौधरी आदि मान्यवर यावेळी मंचकावर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, त्यांचा दर्जा सुधारावा, त्याचप्रमाणे स्वच्छता, आरोग्य, कुटुंब याविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी, यासंदर्भात महिलांना मार्गदर्शन मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, महिलांना विविध कायदेविषयक बाबींची माहिती मिळावी, याकरिताच महिला व बालकल्याण योजने अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांसाठी खास मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती सोनुने यांनी केले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाडीभस्मे, डॉ कमलेश पिसाळकर, अतुल चौधरी यांनी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी खासदार तडस यांच्या हस्ते माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमात पोषण पंधरवाडा अंतर्गत तृणधान्य व भरडधान्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची प्रदर्शनी लावण्यात आली होती.
याप्रसंगी अंगणवाडी सेविका यांनी आपल्यातील कलाविष्कार सादर करीत महिलांचे लक्ष वेधून घेतले. सिंदी सर्कलच्या अंगणवाडी सेविकांनी “खेळ मांडला” या सदराखाली शेतकरी आत्महत्यावर आधारित नाटिका सादर केली. अंगणवाडी सेविका प्रिया डोंगरेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी स्त्रीभृण हत्या, बेटी हिंदुस्थान की, बेटी बचाव बेटी पढाओ आदि सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे संचालन पल्लवी पुरोहित यांनी तर आभार पर्यवेक्षिका यशोदा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सुषमा अंभोरे, शिल्पा मलकवाडे, कनिष्ठ सहाय्यक राजेश शिरसकार यांच्यासह तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.