चक्क पोलिसांनाच मामा बनविणारा “सोलंकी” अखेर गजाआड ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्यातून घेतले ताब्यात

सचिन धानकुटे
वर्धा : – जुगाराच्या अड्डयाची टिप देण्याच्या नावाखाली चक्क पोलीस अधिकाऱ्यालाचं गंडविणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाण्याच्या इंदिरा नगर परिसरातून ताब्यात घेतले. योगेंद्रकुमार अतुलभाई सोलंकी असे त्या अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस अधीक्षकांचा खास बातमीदार असल्याची थाप मारत एका भामट्याने चक्क ऑनलाइन पैसे पाठवण्याची विनंती फोनद्वारे ता. ३१ मार्चला एका पोलीस अधिकाऱ्याकडे केली होती. शहरातील रामनगर परिसरात जुगाराचा मोठा अड्डा असून त्यासंदर्भातील माहितीसाठी फंटर पाठवायचा आणि त्याला मोबाईल सुद्धा घेऊन द्यायचा, त्यामुळे पैशाची गरज असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला लागलीच पैसे तर पाठवलेत परंतु त्यानंतर मात्र त्याने माहिती तर सोडाच आपला फोन देखील बंद करून टाकत चक्क पोलिसांनाच गंडविले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर पोलीस अधिकाऱ्याने रामनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रामनगर पोलिसांत फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा देखील नोंद करण्यात आला.
यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखा तसेच सायबर सेलच्या माध्यमातून तपास करण्यात आला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण तांत्रिक माहिती हस्तगत केली असता सदर आरोपी ठाणे शहरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तत्काळ पोलिसांचे एक पथक ठाण्यासाठी रवाना झाले. दरम्यान तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर आरोपी वास्तव्यास असलेल्या इंदिरा नगर परिसरात माहिती काढली असता, तो भामटा योगेंद्रकुमार अतुलभाई सोलंकी असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस सतत चार दिवस वेगवेगळ्या परिसरात त्याच्या मागावर होते, परंतु तो पोलिसांना सातत्याने हुलकावणी देत पसार होत होता. शेवटी पोलिसांनी ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरातील रंगोली साडी सेंटरमध्ये सापळा रचला आणि त्या भामट्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत दोन मोबाईलसह रोख रक्कम असा एकूण २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यावेळी त्याची अधिक चौकशी केली असता तो भामटा महाराष्ट्रातील बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांना जुगाराचा अड्डा तसेच विदेशी पिस्तूल संदर्भात थापा मारत असल्याचे दिसून आले. त्याच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची यादी असल्याचे देखील पोलिसांना आढळून आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशाप्रमाणे यशवंत गोल्हर, रामकिसन इप्परसह सायबर सेलचे अनुप कावळे आदि कर्मचाऱ्यांनी केली.