अमृततुल्य “चहा” आगीत “स्वाहा”, संपूर्ण साहित्याची राखरांगोळी..! : को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समोरील घटना
सचिन धानकुटे
सेलू : – येथील अमृततुल्य चहाचे दुकान आगीत स्वाहा झाल्याची घटना आज रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या आगीत लाखोंच्या साहित्याची राखरांगोळी झाली असून आगीचे कारण कळू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर असलेल्या कुणाल शेंडे यांच्या अमृततुल्य चहाच्या दुकानाला आज रात्री अचानक आग लागली. दुकान मालक रात्री आठ वाजताच दुकान बंद करून निघून गेला होता. दरम्यान दुकानातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी दुकानाचे कुलूप फोडून नळाच्या द्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत दुकानातील सगळ्या साहित्याची राखरांगोळी झाली होती. आगीत दोन डिस्प्ले बोर्ड, दोन मोठे फ्रिजर, पंखे, फर्निचर, टेबल, खुर्च्या तसेच संबंधित साहित्य अशा सगळ्यांचा कोळसा झाल्याने जवळपास तीन लाखांचे नुकसान झाल्याचे कुणालने सांगितले. ही आग मात्र नेमकी कशामुळे लागली यासंदर्भात कुणालाच काही कल्पना नाही, कारण नेमकी आग लागली तेव्हा दुकान बंद होते.