धक्कादायक : खोट्या कागदपत्रांच्या आधारे विक्रीपत्र करणाऱ्या दाम्पत्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल
सचिन धानकुटे
सेलू : – बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतीचे विक्रीपत्र तयार करणाऱ्या दाम्पत्या विरोधात येथील पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
हिंगणा तालुक्यातील गुमगांव येथील सुरेश मुकुंदराव मुते ह्यांची हमदापूर परिसरात १.६९ हेक्टर शेतजमीन आहे. सदर शेतजमीन ही मुते ह्यांच्या मालकीची असून त्यांच्याच नावाची कागदपत्रे आहेत. २४ नोव्हेंबर २०१५ ते २१ जून २०२३ या कालावधी दरम्यान धरमपेठ नागपूर येथील रहिवासी आरोपी अनिल महादेवराव फुलबांधे आणि त्यांची पत्नी अंजली ह्या दोघांनी संगनमत करीत सदर जमीन खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या नावे केली. याकरिता त्यांनी बनावट आमुखत्यार पत्र तयार करून घेत बनावट इसम आणि त्यांच्या बनावटी आधार कार्डचा वापर करीत ते खरे असल्याचे भासवून विक्रीपत्र देखील तयार करून घेतले. १.६९ हेक्टर जमीनीचा ६ लाख रुपयात सौदा झाल्याचे बनावट विक्रीपत्रात नमूद आहे. ही बाब जेव्हा मुते यांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. सदर तक्रारीच्या चौकशीअंती फुलबांधे दाम्पत्यावर सेलू पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.