कंत्राटी वाहनचालकांवरील अन्याय दूर करा : अन्यथा आंदोलन : अंबिका हिंगमिरेंचा इशारा
वर्धा : वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत रूग्णवाहिकांवर सेवा देणाऱ्या कंत्राटी वाहनचालकांच्या विविध मागण्यांसाठी आज श्रमिक बांधकाम व इतर कामगार संघटनेच्या अध्यक्ष अंबिका हिंगमिरे यांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी वाहनचालकांना नियमितपणे वेतन अदा करण्यासोबतच त्यांच्या वेतनात वाढ करणे तसेच वाढीव भत्ता देण्याची तरतुद करण्याची मागणी अंबिका हिंगमिरे यांनी सीईओंसमोर मांडली. यावेळी यावरच लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंबिका हिंगमिरे यांना दिले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत खासगी कंत्राटाद्वारे वाहनचालकांची सेवा जिल्हा परिषदेकडून घेतली जाते. यामध्ये शासनाच्या यादीवरील सीएससी कंपनीला वानहचालक पुरवठा करण्याचा कंत्राट जिल्हा परिषदेने दिला आहे. यापूर्वी एका संस्थेकडे हा कंत्राट असताना जिल्हा परिषदेकडून प्रत्येक वाहनचालकाला १४ हजार रूपयांपर्यंत वेतन प्राप्त होत होते. मात्र आता सीएससीशी झालेल्या करारानंतर वाहनचालकांच्या हातात सर्व कपातीनंतर केवळ ११ हजार रूपयेच वेतन मिळत आहे. वेतन वाढविणे गरजेचे असताना जिल्हा परिषदेने वेठबिगारी पद्धतीने वाहनचालकांची सेवा घेणे सुरू केले असून गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागासाठी दिवसरात्र सेवा देणाऱ्या वाहनचालकांना सध्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातही नियमितपणे वेतन अदा करण्याची कार्यवाही जिल्हा परिषद तसेच सीएससी कंपनीकडून होत नसल्याने वाहनचालकांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ असल्याची बाब अंबिका हिंगमिरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी वाहनचालकांचे वेतन वाढविण्यासोबतच ८ तासांपेक्षा अधिकचे काम करवून घेतल्यास त्यासाठी प्रति तास ५० रूपये एवढा मोबदला देण्याची तरतुद करण्याचीही मागणी अंबिका हिंगमिरे यांनी रेटून धरली. या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अंबिका हिंगमिरे यांना यावेळी दिले आहे.
निवेदन देतेवेळी वाहनचालक प्रवीण बोबडे, प्रशांत बेाथरे, मधुकर वाघमारे, रामप्रसाद ताकसोडे, प्रवीण चाफले, विनोद उईके, सुभाष मक्ते, सुनील कांबळे, रत्नाकर कांबळे, अरूण शंभरकर, लोकेश भारंगे, नितीन देशमुख, नरेश शंभरकर, संजय नगराळे, संजय वाघ, मधुकर सोमरकर, सुरेंद्र वाघ, किरण जयसिंगपुरे, धीरज सव्वालाखे, किशोर भुसारी, हरिष लोखंडे, किशोर काळकर, सुदास दाते, राजू डंभारे, सुबोध पाटील, घनश्याम शेळके, गौरव लाखे आदींची उपस्थिती होती.
लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन
वाहनचालकांची सेवा वेठबिगारी पद्धतीने घेऊन अधिकारी मात्र सुस्तावले आहेत. नियमित वेतन नाही, त्यात नवीन कंत्राट देताना वाहनचालकांना मिळणाऱ्या वेतनमानाची देखील काळजी घेतल्या गेलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांना वाढीव कामांसाठी मोबदला द्यावा अशी आमची मागणी आहे. यावर निर्णय न घेतल्या गेल्यास आम्ही लवकरच याविरोधात तीव्र आंदोलन छेडू व याची जबाबदारी ही सर्वस्वीपणे जिल्हा परिषद प्रशासनाची असेल असा इशारा अंबिका हिंगमिरे यांनी आपल्या निवेदनातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.